भिवंडी येथील कशेळी भागात गणेश कोकाटे याच्यावर गोळीबार झाल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला आहे. या गोळीबारात कोकाटे मृत्यू झाला. गोळबाराच्या घटनेनंतर रात्री उशीरा नारपोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कोकाटे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन महिन्यापूर्वीही त्याच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत तो बचावला होता.
हेही वाचा- बेकायदा बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल; ठाणे महापालिका आयुक्तांचा अतिक्रमण विभागाला आदेश
ठाण्याहून कशेळीच्या दिशेने बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गणेश त्याच्या मोटारीने जात होता. त्याची मोटार कशेळी टोलनाक्याजवळ आली असता त्याच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी त्याच्या मानेजवळ लागली. तर दुसरी गोळी ही त्याच्या पोटाजवळ लागली. दरम्यान, या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गणेशला तात्काळ ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या गोळीबार \प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. गणेश कोकाटे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तीन महिन्यांपूर्वीच त्याच्यावर ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोळीबार झाला होता. त्यावेळी गोळीबारात तो बचावला होता. या घटनेप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल होता.