कल्याण – महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यामध्ये घरफोड्या करणारे दोन सराईत चोरटे महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केले आहेत. या आरोपींकडून एकूण १२ गुन्ह्यांमधील साडे तीन लाखाहून अधिकचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. महाराष्ट्रासह परराज्यात या दोघांवर गुन्हे दाखल आहेत. अविनाश धनाजी शिंदे (२५, रा. बी केबिन रस्ता, दत्त कुटीर चाळ, अंबरनाथ), सॅमसंग रुबीन डॅनियल (२५, रा. क्वालिटी कंपनीजवळ, बेतुरकरपाडा, कल्याण) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>> कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
चोऱ्या करून हे चोरटे त्या भागातून काही दिवस गायब होत होते. गेल्या महिन्यापूर्वी कल्याण मधील रेल्वे स्थानकाजवळील सांगळेवाडीत एका नागरिकाच्या घरी चोरी झाली होती. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून उपायुक्त सचीन गुंजाळ, साहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने घरफोड्यांचा शोध सुरू केला होता. घरफोडे हे अंबरनाथ, कल्याणमधील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
हेही वाचा >>> अन्याय सहन केलात… आता लढायला सज्ज व्हा; राजन विचारे यांचं भावनिक आवाहन
वरिष्ठ निरीक्षक साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण भिसे, जमादार विजय भालेराव आणि इतर सहा जणांच्या पथकाने गुप्त माहितीदारांमार्फ माहिती काढली. त्यावेळी आरोपी अविनाश शिंदे अंबरनाथ परिसरात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अविनाशचा ठावठिकाणा शोधून त्याला अंबरनाथमधून अटक केली. त्याच्या अटकेने सॅमसंगची माहिती मिळाली. पोलिसांनी सॅमसंगला कल्याण मधून अटक केली. या दोघांच्या अटकेने राज्यासह तेलंगणा राज्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळवी यांनी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यात या दोघांनी चोऱ्या केल्या आहेत. सॅमसंगवर विविध पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. अविनाश चोरलेला माल सॅमसंगकडे देत असे. तो माल सॅमसंग किरकोळ किमतीत दुकानदारांना विकत असे.