डोंबिवली- मागील वर्षभराच्या कालावधीत मुंबई, डोंबिवली, ठाणे परिसरात दिवसा-रात्री एकूण ३७ घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने मुंब्रा येथून रविवारी अटक केली. त्यांच्याकडून २२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३५० ग्रॅम सोन्याचे, ६२० ग्रॅम चांदीचे दागिने आहेत, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सोमवारी येथे दिली.
आपण चोर आहोत हे कोणाला ओळखू येऊ नये म्हणून हे दोन्ही चोरटे साहेबी थाटाचा पोशाख करुन दुचाकीवरुन दिवसा-रात्री चोऱ्या करण्यासाठी फिरत होते. सरुद्दीन ताजुद्दीन शेख (३२, रा. ख्वाजा गरीब नवाज इमारत, अमृतनगर, मुंब्रा), महम्मद जिलानी इसा शहा (४०, रा. पथ्थरवाली शाळेच्या समोर, जदुरभाई इमारत, नागपाडा, मुंबई) अशी चोरट्यांची नावे आहेत.
हेही वाचा >>> एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी धुळवड; नैसर्गिक रंगाचा वापर करून सण साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
गेल्या वर्षभरात डोंबिवली परिसरात दिवसा, रात्रीच्या घरफोड्या वाढल्याने रहिवासी अस्वस्थ होते. पोलिसही या चोऱ्यांनी चक्रावून गेले होते. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी स्थानिक पोलिसांना घरफोड्यांना अटक करण्यासाठी विशेष तपास मोहीम राबविण्याच्या सूचना डोंबिवलीतील पोलिसांना दिल्या होत्या.
गेल्या महिन्यात रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप सहकाऱ्यांसह गस्ती फेरी मारत होते. उसरघर गावाजवळ त्यांना दोन जण दुचाकीवरुन मुंब्रा दिशेने जात असल्याचे दिसले. पोलीस वाहन आपल्या दिशेने येत असल्याचे समजताच दुचाकीवरील दोघांनी दुचाकी सोडून जवळच्या झाडीत पळ काढला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वार पळाल्याच्या दिशेने धाव घेऊन झाडीत लपलेल्या सरुद्दीन, महम्मद यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्यांची पोलीस अधिकारी सानप यांनी चौकशी केली. त्यांनी डोंबिवली, ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली
त्यांच्या जवळील चोरीचा २२ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. डोंबिवलीत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत आठ घरांमध्ये, विष्णुनगर हद्दीत दोन ठिकाणी, नौपाडा हद्दीत एक चोरी केली आहे.
मुंबईतील ताडदेव, शीव, पायधुनी, व्ही. पी. रोड, नागपाडा अशा २५ पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हे दाखल आहेत. या दोघांच्या अटकेमुळे अनेक महत्वाचे गुन्हे उघड होण्याची शक्यता उपायुक्त गुंजाळ यांनी व्यक्त केली.
साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप, सुनील तारमळे, अविनाश वनवे, साहाय्यक उपनिरीक्षक सुरेश डांबरे यांच्या पथकाने आरोपींच्या अटकेची कारवाई केली.
फोटो ओळ