लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण पूर्वेतील नांदिवलीतील मलंगगड रस्त्यावर सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी गेलेल्या एका ६३ वर्षाच्या वृध्देला दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी चाकूचा धाक दाखवून, या महिलेला मारहाण करुन तिच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटला. कोळसेवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तात्काळ तपास करुन टिटवाळा, आंबिवली भागातून दोन जणांना बुधवारी अटक केली.
प्रदीप उर्फ सोनू विश्वकर्मा (२५, रा. राधाकृष्ण चाळ, बनेली, टिटवाळा), असीम अब्दुल अन्सारी (२२, रा. विश्व प्लाझा, अटाळी, आंबिवली) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांवर वेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी सात गुन्हे दाखल आहेत.
आणखी वाचा- ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील लोखंडी टोकदार दिशादर्शक प्रवाशांना मारक
पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ गावात राहत असलेल्या दुर्गावती सिंग (६३) नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी जातात. सकाळी फेरफटका मारुन त्या मलंगगड रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या बाजुला कट्ट्यावर बसल्या होत्या. तेथे दुचाकीवरुन दोन जण आले. त्यांनी दुर्गावती यांना चाकूचा धाक दाखवून तुम्ही ओरडल्या तर ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. दुर्गावती यांच्या मुखात जोराने चापटी मारुन त्यांना घाबरुन सोडले. त्या एकट्या असल्याने दोन्ही चोरट्यांचा विरोध करू शकल्या नाहीत. धमकी आणि मारहाणीत गोंधळून गेलेल्या दुर्गावती यांच्या गळ्यातील दीड ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी भामट्यांनी खेचून काढली. घटनास्थळावरुन पळ काढला.
आणखी वाचा- ठाणे: चार वर्षांपूर्वी घर सोडून ओडिशाला गेलेली मुलगी पुन्हा घरी
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दुर्गावती यांच्याकडून तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. हवालदार जाधव यांना दोन्ही लुटारू आंबिवली-अटाळी, टिटवाळ्या येथील बनेली गावातील रहिवासी असल्याचे समजले. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, हरिदास बोचरे, दिनकर पगारे, हनमंत शिर्के, प्रमोद जाधव, भगवान सांगळे, राजेश कापडी, मिलिंद बोरसे यांच्या पथकाने बनेली, इराणी वस्ती भागात सापळा रचून आरोपींना अटक केली.