ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठाणे पोलीस सज्ज झाले असून दोन हजार पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार आहे. तसेच केंद्रीय सुरक्षा पथक, राज्य गुप्तचर विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी तैनात असतील. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून हाॅटेल, इमारतींची तपासणी केली जात आहे. मैदान परिसरापासून ८०० मीटर भागातील इमारतींमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती नव्याने वास्तव्यास आले आहेत का? याचीही पोलीस तपासणी करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कासारवडवली येथील बोरीवडे परिसरातील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास ४० ते ५० हजार नागरिक एकत्र जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेला मोठ्याप्रमाणात गर्दी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यास सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस अधिकारी मैदान परिसराची तपासणी करत आहेत. बाँब शोधक पथके, राज्य गुप्तचर विभागाकडून परिसराची माहिती घेतली जात आहे. मैदानाच्या परिसरात मोठ्याप्रमाणात गृहसंकुल आहेत. त्यामुळे मैदान परिसरापासून ८०० मीटर अंतरावरील सर्व गृहसंकुलांना पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी भेट घेऊन त्यांना इमारतीमध्ये कोणीही संशयास्पद असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे सूचित केले आहे. नव्याने भाडेतत्त्वावर वास्तव्यास आलेल्या रहिवाशांची देखील पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

हेही वाचा : Mumbra Kalwa Vidhan Sabha Constituency : राष्ट्रावादीच्या बालेकिल्ल्यात कडवी झुंज, जितेंद्र आव्हाड विजयी चौकार लगावणार?

घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात हाॅटेल, लाॅज आहेत. येथे कोण, कुठून वास्तव्यास आले आहेत ? त्यांची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकांकडून घेतली जात आहे. तसेच हाॅटेल आणि लाॅज मालकांना संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. येथील महत्त्वाच्या इमारतींच्या गच्चीवरूनही पोलिसांचे पथक मैदान परिसराची पाहाणी करणार आहेत.

हेही वाचा : बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष, सचिव अखेर अटकेत; ४४ दिवसांनी आरोपींना बेड्या, परिमंडळ ४ पोलिसांची कारवाई

ठाणे पोलीस दलातील चार अपर पोलीस आयुक्त, नऊ पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तचर विभागाचे दोन उपायुक्त, १६ साहाय्यक पोलीस आयुक्त, ६३ पोलीस निरीक्षक, १७८ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, १ हजार ४४६ पुरुष आणि महिला अमलदार, शीघ्र कृती दलाचे पथक असा बंदोबस्त असणार आहे. तसेच साध्या वेशातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील तैनात असतील.

ज्ञानेश्वर चव्हाण, सह आयुक्त, ठाणे पोलीस.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two thousand police deployed in thane city ahead of pm narendra modi s visit css