पालघर जिल्ह्य़ातील सागरी सुरक्षेसाठी पोलीस सज्ज झाले असून अर्नाळा आणि सफाळा येथे दोन सुसज्ज ऑपरेशन सेंटर उभे करण्यात येत आहे. याशिवाय आता गस्तीवरील बोटींना जीपीएस प्रणालीे बसविण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्य़ाचा पश्चिम पट्टा हा सागरी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात १०७ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला समुद्राच्या मार्गाने झाला होता. तसेच भविष्यात समुद्री मार्गाने अतिरिकी शिरण्याचा इशारा यापूर्वीच गुप्तचर खात्याने दिला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग अत्यंत संवेदनशीेल समजला जातो. केवळ पालघरच नव्हे तर भाईंदरपासून डहाणूपर्यंतच्या भागात सागरी आयुक्तालय असावा, अशी येथीेल जनतेची अनेक वर्षांपासूनचीे मागणी होतीे. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यातही आला होता. परंतु ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन झाले आणि हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यामुळे या भागाच्या सुरक्षेचीे जबाबदारी आता पालघर जिल्ह्य़ातल्या पोलिसांवरच आहे.
या पश्चिम किनारपट्टीवर एकूण १३ सागरी पोलीस ठाणी आहेत. तसेच सुरक्षेसाठी ३३ चौक्या बांधण्यात आल्या आहेत. ज्या संभाव्य ठिकाणावरून समुद्रमार्गे प्रवेश करता येतील असे २९ लॅण्डिंग पॉइंट पोलिसांनी तयार केलेले आहेत. सध्या पोलिसांकडे गस्तीसाठी ७ बोटी आहेत. पण नंतर त्यात वाढ करण्यात येणार आहे. या बोटींवरील गस्ती अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांच्यात जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलीे. याशिवाय १८ वॉच टॉवरदेखील उभारण्यात आले आहेत. पोलिसांना सागरी सुरक्षेसाठी मदत व्हावी म्हणून पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांची मदत घेतली असून एक हजारांहून अधिक खलाशांना सागर रक्षक दल बनविण्यात आले आहेत. समुद्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर त्यांची नजर असते आणि ते पोलिसांनी माहिती देत असतात. प्रत्येक वेळी पोलीस हजर असतातच असे नाही. त्यामुळे हे सागर रक्षक दलातले खलाशी दक्ष राहून पोलिसांचेच काम करत असतात. एखादा अनोळखी व्यक्ती आला किंवा अनोळखी बोट दिसली की त्याची सूचना पोलिसांना देण्यात येते. सागरी सुरक्षेसाठी पोलिसांनी १०९३ या क्रमांकाची हेल्पलाइनही सुरू केलेली आहे. सध्या किनारपट्टीवर सागरी कवच अभियान सुरू असून सर्व सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.
सुरक्षेसाठी तीन ऑपरेशन सेंटर
सागरी सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी पोलिसांनी धाकटी डहाणू, अर्नाळा आणि सफाळा येथे ऑपरेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले. या ऑपरेशन सेंटरमध्ये अत्याधुनिक हत्यारे, साधनसामग्री, आपत्कालीेन कार्यासाठी लागणारी यंत्रणा आणि पोलीस बळ तैनात असतील. मुख्यालयातून सर्वच भागावर लक्ष ठेवणे आणि नियंत्रण करणे कठीण असते. त्यामुळे या ऑपरेशन सेंटरची संकल्पना पुढे आली. कुठल्याही क्षणी या ऑपरेशन सेंटरमधून मदत पोहोचवणे शक्य होऊ शकणार आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी सांगितले. धाकटी डहाणू येथील सेंटर पूर्ण झाले असून उर्वरित दोन सेंटरही लवकरच तयार होणार आहेत.
या पट्टय़ाला तीेन थरांचे सुरक्षा कवच आहे. नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांचे हे कवच आहे. समुद्रामार्गे होणारा कुठलाही हल्ला आम्ही परतवू शकतो, असा दावा पोलिसांनी केला आहे. मुंबईवर हल्ला होण्यापूर्वी वसईच्या समुद्रातील मच्छीमारांकडे सदोष वॉकीटॉकी यंत्रे आढळले होते. त्या वॉकीटॉकी यंत्रातून नौदल, सीमाशुल्क विभागाचे संदेश ऐकू येत होते. त्यावर कारवाई करून ते जप्त करण्यात आले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक रामराव पवार आणि कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक सत्यपाल सिंग यांनी हा सागरी सुरक्षेला मोठा धोका असल्याचे केंद्राला लेखी कळवले होते. त्यामुळे अशा प्रत्येक छोटय़ा गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सागरी पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांना पोहण्याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दर सहा महिन्यांत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सागरी मॉक डिम्र्ल केली जाते, परंतु एकदाही पोलिसांना अपयश आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.