वर्षभरात १७४ बंधाऱ्यांचे काँक्रीटीकरण; जूनपूर्वी ५० बंधारे पूर्ण होणार
पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात नैसर्गिक ओढय़ा-नाल्यांचे पाणी वनराई बंधाऱ्यांद्वारे अडविण्याचा प्रयोग ठाणे जिल्हय़ात कमालीचा यशस्वी झाल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने त्या जलस्रोतांचे कायमस्वरूपी संवर्धन केले जाणार आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, वन विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हय़ात विविध ठिकाणी यंदा सुमारे दोन हजार वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे अपुऱ्या पावसामुळे शहरी विभागात भीषण पाणीसंकट असताना वनराई बंधाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील जनतेला मात्र फार मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात त्यातील १७४ बंधाऱ्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून जून महिन्यापूर्वी त्यातील ५० बंधाऱ्यांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्हय़ात मुबलक पाऊस पडतो. तरीही उन्हाळ्यात बऱ्याच गावपाडय़ांमध्ये पाणीटंचाई भेडसावते. काही गावांना तर टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडूनही अजूनही तरी तशी परिस्थिती उद्भवलेली नाही. पावसाचे पाणी अडवून जिरवून ठेवण्यात वनराई बंधारे कमालीचे उपयुक्त ठरल्यानेच टंचाईच्या फारशा झळा बसल्या नाहीत. त्यामुळे पुढील काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने छोटय़ा बंधाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हय़ातील २६ गावे निश्चित करण्यात आली असून येत्या पाच वर्षांत ४० कोटींचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. वनराई बंधारे उपयुक्त असले तरी तो तात्पुरता उपाय असतो. दरवर्षी बंधारे बांधण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व बंधाऱ्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे.

विहिरींपेक्षा बंधारे उपयुक्त
विहीर आणि बंधारा बांधायला साधारण सारखाच म्हणजे प्रत्येकी सरासरी ३ लाख रुपये खर्च येतो. मात्र विहिरीच्या तुलनेत बंधाऱ्यामुळे दुप्पट क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामुळे भविष्यात विहिरींऐवजी बंधारे बांधण्यास जिल्हा प्रशासन प्राधान्य देणार आहे. ठाणे जिल्हय़ातील बहुतेक शेतकरी फक्त खरीप पिकांवर अवलंबून होते. बंधाऱ्यांमुळे पाणी उपलब्ध झाल्याने अनेक शेतकरी दुबार पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तच्या काळात रोजगारासाठी कराव्या लागणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे. बंधाऱ्यांमुळे जलसंवर्धन होऊन भूजल पातळी वाढते. परिणामी परिसरातील विहिरीतून मुबलक पाणी मिळू लागते. जनावरांना पाणी मिळते.

‘रोटरी’ही ३१ बंधारे बांधणार
ठाणे परिसरातील रोटरी समूहातर्फे विविध कंपन्यांकडून व्यावसायिक सामाजिक बांधिलकी उपक्रमातून ठाणे-पालघर परिसरांत काँक्रीटचे बंधारे बांधण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेतून ३७७ बंधारे बांधण्यात आले आहेत. शहापूर, मुरबाड, जव्हार आणि डहाणू भागांत ३१ बंधाऱ्यांची कामे यंदा सुरू असल्याचे या प्रकल्पाचे समन्वयक हेमंत जगताप यांनी सांगितले.

Story img Loader