ठाणे : फुकट रेशन मिळत असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी एका ७५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हात चालाखीने चोरी करून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथील पद्मानगर परिसरात ७५ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. ७ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता त्या एका कामानिमित्ताने तहसील कार्यालयाच्या दिशेने पायी जात होत्या. त्याचवेळी एकजण त्या ठिकाणी आला. त्याने महिलेला अडविले आणि सांगितले की, गरीबांसाठी एक मुलगा रेशन देत आहे. महिलेला विश्वास बसल्याने त्या त्याच्यासोबत भिवंडीतील क्वाटगेट परिसरात गेल्या. याच परिसरात आणखी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्यानंतर दोघांनी वृद्धेला बतावणी करण्यास सुरूवात केली. त्यांनी महिलेला सांगितले की, तुमच्या गळ्यात सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवा. महिला तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवत असताना, भामट्यांनी त्यांनी पिशवी व्यवस्थित ठेवतो असे सांगून हातचालाखीने महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर ते दोन्ही भामटे तेथून पसार झाले. अखेर मंगळवारी वृद्धेने याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ६७ हजार रुपयांचे दागिने भामट्यांनी चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गेल्याकाही वर्षांपासून अशा प्रकारची बतावणी करुन वृद्ध महिलांची फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत चालले आहे. अशाप्रकारच्या अनेक टोळ्या वृद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांचे दागिने चोरत असल्याचे स्पष्ट होत आहे.