कल्याण डोंबिवली पालिकेच्या भरारी पथकाने खडकपाडा भागात शनिवारी दोन टन प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. पालिका घनकचरा विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एकत्रितपणे जप्त केलेल्या प्लास्टिकची छाननी करत आहेत. या छाननीनंतर प्लास्टिक उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेता यांच्यावर घनकचरा अधिनियमान्वये कारवाई केली जाणार आहे, असे पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>>प्रेमसंबंधातून कल्याणमध्ये मानखुर्दच्या तरुणाची हत्या
घनकचरा विभागाच्या भरारी पथक आणि ब प्रभाग साहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांना कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातून प्लास्टिकच्या गोणी घेऊन एक टेम्पो जाणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. गोणींमध्ये प्लास्टिक आहे हे दिसू नये म्हणून गोण्यांवरती खोक्यांचे पुठ्ठे ठेवण्यात आले होते. पालिकेचे भरारी पथक उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात तैनात होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. ठरल्या वेळेत एक टेम्पो खोके घेऊन जात असल्याचे तपासणी पथकाला दिसले. त्यांनी टेम्पोला अडवून त्याची तपासणी सुरू केली. त्यावेळी टेम्पो चालकाने माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली. भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी पुठ्ठ्यांखाली दडवून ठेवलेल्या ३५ गोण्या खाली उतरुन घेतल्या. गोण्यांची पाहणी केली असता त्यात प्लास्टिकचे गठ्ठे आढळून आले.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील रिक्षा चोराला सागर्ली गावातून अटक
एकल वापराचे प्लास्टिक असेल तर ते जप्त करुन या प्लास्टिकचा उत्पादक, पुरवठादार यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. हे प्लास्टिक चालकाने कोठुण आणले, ते कुठे नेले जाणार होते याची माहिती घेतली जात आहे, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.कल्याण डोंबिवली पालिका परिसरात मागील तीन वर्षापासून प्लास्टिक मुक्ती अभियान राबवुनही प्लास्टिकचा वापर कमी होत नसल्याने पालिका् अधिकारी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी हैराण आहेत. यापूर्वी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यकाळात भिवंडी जवळील १० प्लास्टिक कारखान्यांवर कारवाई करण्यात आली होती. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती उल्हासनगर, भिवंडी भागात चोरुन केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांनी प्रथमच एवढी मोठया प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. प्लास्टिकचा दर्जा पाहून त्याप्रमाणे संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
” जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची छाननी करण्यात येत आहे. एकल प्लास्टिक वापरातील हे प्लास्टिक असेल तर संबंधितांवर येणार आहे.”-अतुल पाटील,उपयुक्त,घनकचरा विभाग.