ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांच्या ये जा करण्याच्या मार्गात प्रवासी आपल्या दुचाकी उभ्या करुन नोकरीसाठी निघून जातात. दिवसभर दुचाकी रेल्वे स्थानका बाहेर सार्वजनिक रस्त्यावर, रेल्वे तिकीट खिडकीच्या मार्गात आणि प्रवेशव्दाराच्या मार्गात उभ्या करण्यात येत असल्याने अन्य प्रवाशांना येजा करताना अडथळे येत आहेत.
हेही वाचा- ठाणे : भंडार्ली प्रकल्प पुन्हा अडचणीत, जागामालकांना हवी भाडेवाढ
ठाकुर्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी कमी असते. डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, नवापाडा, गरीबाचा पाडा, कुंभारखाणपाडा, राजू नगर भागातील बहुतांशी नोकरदार वर्ग आपल्या दुचाकी वाहनाने ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानक भागात येतो. पश्चिम भागात दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ नाही. त्यामुळे नोकरदार वर्ग सार्वजनिक रस्त्यावर, ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रवाशांच्या येजा करण्याच्या मार्गिकेत, तिकीट खिडकीच्या समोर दुचाकी उभ्या करुन ठेवतात.
हेही वाचा- ठाण्याच्या उपवन भागात होणार संस्कृती आर्ट महोत्सव
या भागात रिक्षा, मोटारीने येणाऱ्या प्रवासी, नागरिकांना मात्र रस्त्यावरील दुचाकी वाहनांचा अडथळा पार करत रेल्वे स्थानक गाठावे लागते. मालवाहू अवजड ट्रक या भागात आला तर चालकाला अडथळे पार करत रेल्वे स्थानक भागात यावे लागते. रेल्वेच्या जागेत हा भाग येतो. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस या भागात फिरत असतात. त्यांना हा बेकायदा वाहनतळ दिसत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाकुर्ली पूर्व भागात रेल्वे स्थानक भागात रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. ९० फुटी ठाकुर्ली रस्त्यावर दोन ते तीन रांगांमध्ये दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणात या भागात रिक्षा वाहनतळ, दुचाकी वाहनतळाची सुविधा रेल्वे आणि पालिका प्रशासनाने संयुक्तपणे उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.