डोंबिवली रेल्वे स्थानक भागात महापालिकेच्या वाहनतळाची वानवा आहे. त्यामुळे डोंबिवलीतील सिमेंटचे रस्ते सध्या दुचाकींसाठी पार्किंगसाठी सोयीचे ठरले आहेत. रस्त्यांची कामे सुरू असल्याने याच ठिकाणी दुचाकी वाहनचालक वाहने उभी करून कामाला निघून जात आहेत. त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यांवर दुचाकींचे वाहनतळ उभे राहिल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
डोंबिवलीतील फडके रस्ता, पाथर्ली रस्ता भागात सिमेंट रस्ते वाहनतळ बनले आहेत. महिनाभरापासून फडके रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटचे काम सुरू आहे. टप्प्याटप्याने हे काम करण्यात येत आहे. २० फुटांच्या रस्त्याचा एक तुकडा तयार झाल्यानंतर पुढील तुकडा तयार होईपर्यंत तयार झालेल्या सिमेंट रस्त्यावर दुचाकी वाहनचालक वाहने उभी करून ठेवत आहे. या ठिकाणी पालिकेकडून कोणताही दर आकारला जात नाही. त्यामुळे गल्लीबोळात वाहने उभी करण्यापेक्षा दुकानासमोर, गर्दीत ही वाहने उभी ठेवण्यात येत असल्याने चोरीची भीती या ठिकाणी नसल्याचे वाहन चालकांनी सांगितले.
फडके रस्त्यावर ८० ते ९० दुचाकी दररोज सिमेंट रस्त्यावर उभ्या केल्या जातात. पाथर्ली रस्त्यावर कोंबडय़ा वाहून नेणारी वाहने, दुचाकी, ट्रक उभे करून ठेवण्यात येत असल्याचे चित्र आहे.
कस्तुरी प्लाझाजवळील टाटा लाईनखालील वाहनतळ दुचाकी वाहनांनी गजबजून गेलेले असतात. मानपाडा रस्त्यावरील सम, विषम तारखांना वाहने ठेवण्यास जागा नसते. डोंबिवली पूर्व भागातील आगरकर, नेहरू रस्ता, अंतर्गत गल्ल्या, पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता, महात्मा गांधी रस्ता, सुभाष रस्त्यांवर दुचाकी वाहन रस्त्याच्या दुतर्फा असतात.
द्वारका हॉटेलसमोर रेल्वेचे अधिकृत वाहनतळ आहे. तेथे वाहन ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याने वाहन चालक त्या ठिकाणी वाहन ठेवण्यास कचरतात.
डोंबिवलीत सिमेंटच्या नव्या रस्त्यांवर दुचाकींचे ‘पार्किंग!’
डोंबिवली रेल्वे स्थानक भागात महापालिकेच्या वाहनतळाची वानवा आहे. त्यामुळे डोंबिवलीतील सिमेंटचे रस्ते सध्या दुचाकींसाठी पार्किंगसाठी सोयीचे ठरले आहेत.
First published on: 30-01-2015 at 06:38 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two wheeler parking on new cement roads in dombivali