ठाणे : भिवंडी येथील जुन्या मुंबई-आग्रा रोडवर टँकरच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी नारपोली पोलीस ठाण्यात टँकर चालका विरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
सनी निषाद (१६) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. भिवंडीतील कामतघर परिसरात तो त्याच्या कुटूंबासह राहत होता. काही कामाकरिता बुधवारी सनी मित्राची दुचाकी घेऊन बाहेर गेला होता. काम झाल्यानंतर सनी मित्राला दुचाकी परत करण्यासाठी जात असताना देवजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर जुना मुंबई आग्रा रोड येथे त्याच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने धडक दिली.
या धडकेत सनी जमिनीवर पडला आणि टँकरच्या मागील टायर त्याच्यावरुन गेले. या अपघातात सनी गंभिरित्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, त्याच्या डोक्याला खूप मार बसल्यामुळे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सनीच्या वडिलांनी टँकर चालक दिनेश रामप्रसाद गौन याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरु आहे.