डोंबिवली – तळोजा-खोणी रस्त्यावर एका ट्रेलर चालकाने निष्काळजीपणाने ट्रेलर चालवित असताना अचानक ट्रेलर रस्त्यावर थांबविला. त्याचवेळी पाठीमागून येत असलेला एक दुचाकी स्वार वेगाने ट्रेलरवर आदळला. या धडकेत दुचाकीला आग लागून दुचाकीवरील चालक लागलेल्या आगीत होरपळून मरण पावला. मागील चार दिवसापूर्वी खोणी तळोजा रस्त्यावरील उसाटणे भागात हा अपघात घडला.

या अपघातात दुचाकी स्वार राजेश राम (३०) जागीच मरण पावले. या अपघात प्रकरणी राजेश यांचा सहकारी ओकील राम यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुध्द भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथ येथे राहणारे मयत राजेश राम आणि ओकील राम हे एका कंपनीत काम करतात. ते तळोजा येथील आपल्या पर्यवेक्षकाकडे दुचाकीवरून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथून खोणी तळोजा रस्त्याने जात होते. उसाटने दिशेने बब्लू ढाब्यासमोरून जात असताना त्यांच्या समोर एक ट्रेलर धावत होता. त्यांच्या पाठीमागून राजेश राम आपली दुचाकी नेत होते.

ट्रेलर चालकाने निष्काळजीपणाने आणि हयगयीने ट्रेलर चालवून अचानक रस्त्याच्या मध्यभागी ट्रेलर थांबवला. भरधाव असलेला ट्रेलर अचानक थांबल्याने दुचाकी स्वार राजेश राम आणि पाठीमागील कामगार दुचाकीसह ट्रेलरला जाऊन धडकले. तात्काळ दुचाकीला आग लागली. दुचाकीच्या पाठीमागे बसलेले ओकील राम बाजुला फेकले. दुचाकीला लागलेल्या आगीत दुचाकी स्वार राजेश राम होरपळले. त्यांच्या शरीराला जखमा झाल्या. ढाबा चालकांनी पाईपने पाणी मारून दुचाकीला लागलेली आग विझवली.

ही माहिती हिललाईन पोलिसांना देण्यात आली. जखमी राजेश राम यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ति रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. अलीकडे डम्पर, मिक्सर, हायवा चालक भरधाव वेगात वाहने चालवित असल्याने या वाहनांमुळे शहर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Story img Loader