लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: ग्राहक म्हणून जवाहिऱ्याच्या दुकानात येऊन दुकान मालकाची नजर चुकवून लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या दोन महिलांना रामनगर पोलिसांनी कळवा येथील खारेगाव भागातून सोमवारी अटक केली आहे. या दोघी नणंद-भावजया आहेत. त्यांच्यावर राज्याच्या विविध भागात एकूण १६ गुन्हे दाखल असल्याची माहती पुढे आली आहे.
उसाबाई मकाले, निलाबाई डोकले अशी अटक महिलांची नावे आहेत. या दोघी मूळच्या छत्रपती संभाजीनगर भागातील रहिवासी आहेत. चोरीच्या उद्देशाने त्यांनी आपले बस्तान खारेगाव झोपडपट्टी भागात बसविले आहे. कल्याण, ठाणे, डोंबिवली परिसरातील अनेक जवाहिऱ्यांना या महिलांनी गंडा घातला असण्याचा संशय पोलिसांना आहे.
हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिकेने मालमत्ता कर, अभय योजनेची मुदत वाढवली
गेल्या आठवड्यात डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील विनायक ज्वेलर्सचे मालक मांगिलाल गुर्जर यांची दोन महिलांनी फसवणूक केली होती. सकाळच्या वेळेत दोन महिला ग्राहक म्हणून दुकानात आल्या. त्यांनी चांदीचे पैंजण खरेदी करायचे असा बहाणा करुन दुकानातील चांदीचे पैंजण चोरुन नेले होते. या महिला निघून गेल्यावर मांगीलाल यांना चांदीचा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले. दोन महिलांनी हा प्रकार केल्याने त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
हेही वाचा… शहापूर जवळ समृध्दी महामार्गावर भुसभुशीत मातीमुळे क्रेन अपघात
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या महिलांचा शोध घेतला. त्या खारेगाव भागातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना सोमवारी अटक करण्यात आली. या दोन महिलांच्या अटकेने राज्याच्या विविध भागातील जवाहिऱ्यांना लुटण्याचे प्रकार उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.