डोंबिवली: डोंबिवली येथील पश्चिमेतील गरीबाचापाडा भागातील मिलेनियम पार्क भागात राहत असलेल्या दोन महिलांची भामट्याने अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवुन १२ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या महिलांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मागील वीस दिवसाच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. श्रिया गंगाधर खडगी असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार श्रिया आणि त्यांच्या मैत्रिणीला एका भामट्याने मोबाईलवर संपर्क साधला. आमच्याकडे अर्धवेळ नोकरीची संधी आहे. तुम्ही इच्छुक असाल तर तुमचे काम होईल, असे आश्वासन दिले. तत्पूर्वी तुम्हाला काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतील, असे व्हाॅट्स संदेशातून भामट्याने कळविले. या प्रक्रिया पूर्ण करण्याचे कारण पुढे भामट्याने या दोन्ही महिलांना काही तांत्रिक विषय सोडविण्यास दिले. ते त्यांनी पूर्ण करावेत म्हणून त्यांना काही रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास सांगितली. अशाप्रकारे या महिलांचा विश्वास संपादन करुन भामट्याने या महिलांकडून मागील २० दिवसांच्या कालावधीत १२ लाख ५९ हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून उकळले.
हेही वाचा >>> ठाण्यात दहीहंडीनिमित्त ठाकरे शिंदे गटात बॅनरवॉर
सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही महिला भामट्याकडे नोकरीचे नियुक्ती पत्र आणि आवश्यक कागदपत्रे मागू लागल्या. त्यावेळी भामट्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तो दोघींच्या संपर्काला प्रतिसाद देत नव्हता. आपल्याला नोकरी नाही तर आपले भरणा केलेले पैसे परत करावेत असा तगादा या महिलांनी लावला. त्यालाही भामट्याने प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर या महिलांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरीक्षक राहुल खिलारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.