ठाणे: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका व्यक्तीला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वागळे इस्टेट येथील सीपी तलाव परिसरात जखमी ४५ वर्षीय व्यक्ती राहतात. ते एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. शनिवारी सायंकाळी ते नैसर्गिक विधीसाठी एका सार्वजनिक स्वच्छतागृहात जात होते. पायी जात असताना दोन तरुण त्यांच्या दिशेने आले. त्यांनी त्या व्यक्तीकडून दारू पिण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. परंतु त्या व्यक्तीने त्यांना नकार दिला. त्यानंतर ते पुढे निघून गेले.

स्वच्छतागृहातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्या तरुणांनी त्यांना अडविले. त्यापैकी एका तरुणाने त्यांच्या डोळ्याचा चष्मा घेतला. त्यानंतर त्या दोघांनीही तेथून पळ काढण्यास सुरुवात केली. तरुण पळू लागल्यानंतर त्या व्यक्तीने त्या तरुणांचा पाठलाग सुरु केला. ते तरुण एका पडीक कंपनीमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ करत तो व्यक्तीही तेथे गेला.

दोघांनी त्यांना पकडून एका झाडाला बांधले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. व्यक्तीने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यानंतर तरुणांनी तेथून पळ काढला. दरम्यान, एक व्यक्ती तेथून जात असताना त्याचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यानंतर त्याने त्यांची सुटका केली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.