मासे पकडण्यासाठी नदीवर गेले असता वीज पडून मृत्यू
भिवंडी : भिवंडी – येथील मौजे – चिराडपाडा गावातील फुलोरे या पाड्यामध्ये राहणाऱ्या दोन तरुणींच्या अंगावर विज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. या घटनेत शितल वाघे (१७) आणि योगिता वाघे(२०) या दोघींचा मृत्यू झाला असून सुगंधा वाघे(४०) आणि रोशन ठाकरे(२०) हे दोघं जखमी झाले आहेत. दोन्ही तरुणींचे मृतदेह शवविच्छेदना साठी पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ठाणे तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी चार ते सात या तीन तासाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस आणि विजा कोसळत होत्या. याच दरम्यान शितल ,योगिता, सुगंधा आणि रोशन मासे पकडण्यासाठी भातसा नदीवर गेले होते. सायंकाळी ५.३० च्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने चौघे जण घरी परतत होते. मात्र याच वेळेस रस्त्यात शितल आणि योगिता या दोघींवर वीज कोसळली. यात त्या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर सुगंधा आणि रोशन हे जखमी झाले आहेत. सुगंधा यांना भिवंडी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रोशन याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शितल आणि योगिता या दोघींचे मृतदेह पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले आहेत.