ठाकुर्ली-डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मागील दोन दिवसात दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या दोन्ही अपघातांची नोंद करण्यात आली आहे.

गणेश बाबी कोळी (३५), अमोल विकास हडपी (२९, रा. हडपी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. गणेशला कोपर रेल्वे स्थानका जवळ लोकलची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. कोपर रेल्वे स्थानक भागात बहुतांशी प्रवासी रेल्वे जिन्या ऐवजी रेल्वे मार्गाचा उपयोग करतात. रात्रीच्या वेळेत अनेक वेळा समोरून येणारी लोकल कोणत्या मार्गिकेतून येते ते लोकलच्या दिव्यांच्या प्रकाश झोतामुळे कळत नाही. प्रवासी त्या झोतामध्ये दिपून जातो, त्यामुळे असे अपघात होत आहेत, असे एका पोलिसाने सांगितले.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ लोकल मधून पडून अमोल हडपी याचा मृत्यू झाला. त्याच्या जवळील आधारकार्ड वरून तो मालवण तालुक्यातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना कळविले आहे.रेल्वे प्रवाशांनी रेल्वे मार्गातून येजा करू नये. जिन्यांचा वापर करावा असे आवाहन डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.