डोंबिवली- कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री दोन तरुणांचा लोकलने उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे मार्गात उभे राहून मोबाईलवर रील्स बनविताना या तरुणांचा मृत्यू झाला की रेल्वे मार्ग ओलांडताना त्यांचा मृत्यू झाला, याचा तपास डोंबिवली लोहमार्ग पोलीस करत आहेत.
चेतन गोगावले, सुयोग उतेकर अशी मयत तरुणांची नावे आहेत. या दोघांच्या मोबाईलच्या चिंधड्या उडाल्या आहेत. पोलिसांनी या मयत तरुणांचे मोबाईलचे भाग जमा करुन ते तांत्रिक विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. या तपासणीतून ते रेल्वे मार्गात उभे राहून रील्स बनवित होते की ते मार्ग ओलांडत होते याचा माग लागणार आहे. या अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.