लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : भिवंडी येथे मुंबई नाशिक महामार्गावर सोमवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने आशिष वर्मा (१४) आणि खुर्शीद आलम नजीर अली (१८) या दोघांचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने दहीहंडीमध्ये पारितोषिके जिंकल्याने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी दोघेही गेले होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
भिवंडी येथील न्यू टावरे नगर परिसरातील एका गोविंदा पथकाने दहीहंडीमध्ये पारितोषिके जिंकली होती. त्यामुळे पथकातील गोविंदासाठी वाशिंदमधील एका शेतघरात पार्टीचे आयोजन केले होते. आशिष आणि खुर्शीद हे दोघेही रविवारी सायंकाळी पार्टीला जाण्यासाठी निघाले. सुरुवातीला खासगी बसगाडीचे नियोजन करण्यात आले होते. काही कारणास्तव बसगाडी रद्द झाल्याने आशिष आणि खुर्शीद त्यांच्या एका मित्राच्या दुचाकीवर वाशिंदला गेले होते. तेथे पार्टी केल्यानंतर सोमवारी पहाटे सर्वजण घरी परतत होते. त्यावेळी आशिष आणि खुर्शीद हे दोघेही पुन्हा दुचाकीवरून प्रवास करत होते.
आणखी वाचा-ठाणे : चोरीच्या संशयावरून एकाची हत्या, चौघांना अटक
पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी भिवंडी येथील संग्रीला रिसॉर्ट परिसरात आली असता, एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक डाव्या दिशेला तर, आशिष आणि खुर्शीद उजव्या दिशेला पडले. त्यामुळे धडक देणाऱ्या वाहनाने आशिष आणि खुर्शीद या दोघांना चिरडले. दरम्यान, या घनटेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे भिवंडी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाता प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.