बदलापूर : धुळवडीच्या दिवशी बदलापुरात उल्हास नदीत बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या आणखी दोन तरुणांचा उल्हासनदीत बुडून मृत्यू झाला आहे. विवेक तिवारी (१८) आणि विनय शहा (१७) अशी या दोघांची नावे असून ते मुंबईतील पवई हिरानंदानी आयटी पार्क परिसरात राहणारे होते.

विवेक आणि विनय हे दोघे मित्र शनिवारी फिरण्यासाठी उल्हास नदीच्या वसत बंधाऱ्यावर आले होते. तेथे पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. याबाबत माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दलासह घटनास्थळी धाव घेतली.

सुमारे तीन तास शोध घेतल्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागल्याची माहिती भागवत सोनोने यांनी दिली. दरम्यान, उल्हासनदीत बुडून मृत्यू होण्याच्या अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होते आहे. अनेक जण पर्यटनाच्या हौसे खातर उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरतात. अनेकांना नदीची खोली माहिती नसते. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक जण पाण्यात बुडत आहेत. अनेक जण धाडस करत निर्मनुष्य ठिकाणी पोहण्यासाठी जातात. त्यामुळे अशा काही ठिकाणी फलक लावण्याची मागणी केली जाते आहे.