डोंबिवली – डोंबिवली, कल्याणमधील काही आधार केंद्र चालकांकडे तीन ते चार आधार यंत्रे आहेत. ही यंत्रे आधार केंद्र चालक अन्य व्यक्तिला २५ हजार रुपये अनामत रक्कम घेऊन भाड्याने देत आहेत. या यंत्रांच्या बदल्यात चालविणाऱ्या व्यक्तीने केंद्र चालकाला दरमहा सुमारे तीन ते चार हजार रुपये भाडे द्यायचे आहे. हा प्रकार डोंबिवली, कल्याण शहरात वाढत असल्याने काही नागरिकांनी याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत.
आमदार प्रताप सरनाईक यांनीही डोंबिवलीतील एक प्रकरणाचा आधार घेऊन ठाणे जिल्हाधिकारी यांना आधार केंद्र चालकांकडून सुरू असलेल्या गैरप्रकार निदर्शनास आणला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील एक नागरिक, एक महिलेकडून आधार केंद्र चालकाने २५ हजार रुपये अनामत रक्कम घेऊन आधार यंत्र भाड्याने दिले होते. या महिलेने काही महिने आधार केंद्र भाड्याच्या आधार यंत्राच्या साहाय्याने चालविले. या महिलेकडून केंद्र चालकाचे काही महिन्यांचे भाडे थकले. महिला केंद्र चालक भाडे देत नाही म्हणून केंद्र चालकाने या महिलेच्या कार्यालयातील आधार यंत्र उचलून नेले. त्यामुळे ही महिला चालवित असलेल्या आधार केंद्रात नियमित आधार कामासाठी येणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. शहराच्या विविध भागात आधार केंद्र असल्याने नागरिकांना त्याचा लाभ घेता येतो. आधार यंत्र नसल्याने या महिलेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
हेही वाचा – टिटवाळ्यात दुकान मालकाची हत्या करणाऱ्या नोकराला साथीदारांसह अटक
डोंबिवली एमआयडीसीतील एका नागरिकाला आधार केंद्र चालकाने आधार यंत्र भाड्याने देण्याचे आश्वासन दिले होते. या नागरिकाने केंद्र चालकाला २५ हजार रुपये अनामत रक्कम दिली. आता सहा महिने उलटले तरी केंद्र चालक आमच्याकडे आधार यंत्र नाहीत. अशी उत्तरे देऊन आधार यंत्र देण्यास टाळाटाळ करत आहे, अशी माहिती या प्रकरणातील तक्रारदाराने दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्हाला आधार केंद्र मिळत नसल्याने आधार यंत्रांचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी उत्तरे आधार केंद्र चालक देत आहेत. आधार केंद्र भाड्याने देण्याच्या प्रकारात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित दोन मध्यस्थ महत्त्वाची भूमिका करत आहेत. हे मध्यस्थ आधार केंद्र चालक आणि आधार यंत्र भाड्याने घेणारे नागरिक यांचा दुवा म्हणून काम करतात. जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत आधार यंत्र भाड्याने देणे, केंद्र चालक आणि भाडेकरू यांच्यात काही वाद झाला तर ही प्रकरणे स्थानिक पातळीवर मिटविण्यासाठी महत्त्वाची भूमिका करत आहेत, असे काही भाडेकरू केंद्र चालकांनी सांगितले.
‘व्हीएलई’ हा गुप्त संकेतांक देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केंद्र चालकांना आधार यंत्र सुपूर्द केली जातात. मग ‘व्हीएलई’ संकेतांक आधार केंद्र भाडेकरू केंद्र चालकांना कोणत्या नियमाने देतात, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आधार केंद्राशी संबंधित पत्रात आ. प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना म्हटले आहे, की रेंवती संदीप अमृतकर या डोंबिवली एमआयडीसीत राहतात. जानेवारी २०२० पासून त्या डोंबिवली पूर्वेतील नेहरू रस्त्यावरील भाजी मंडईच्या जागेत केंद्र, राज्य शासनाच्या नियमानुसार आधार केंद्र चालवित होत्या. त्यांना ओळखपत्र क्रमांक शासनाकडून देण्यात आला आहे. त्यांना डी.आय.डी. कीट देण्यात येत नसल्याने त्यांना आधार केंद्र सुरू करता येत नाही. त्यामुळे अमृतकर यांना आधार केंद्र सुरू करण्यासाठी आणि या केंद्रात आधार कार्डाशी संबंधित कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना तातडीने आवश्यक कीट देण्यात यावे, अशी मागणी आ. सरनाईक यांनी केली आहे. तसेच, कल्याण, डोंबिवली परिसरात एकूण किती आधार यंत्रे आहेत. किती केंद्र चालकांकडे किती आधार यंत्रे आहेत. किती जणांकडे व्हीईएल संकेतांक आहे. त्याचा किती जण दुरुपयोग करतात या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी सुरू करावी, अशी मागणी या कामाशी संबंधित काही केंद्र चालकांनी केली आहे.
हेही वाचा – आधारकार्ड बँकखात्यासोबत लिंक करण्याच्या बहाण्याने एकाची ४० हजार रुपयांना फसवणूक
“यंत्र भाड्याने देण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. आधार केंद्र चालक त्याच्याजवळील आधार यंत्र चालविण्यासाठी साहाय्यक ठेऊ शकतो. तो ते यंत्र त्याला चालविण्यासाठी देत नाही. अशी काही महत्त्वाची तक्रार असेल तर संबंधिताने पुढे यावे त्याचे निराकरण केले जाईल.” असे ठाणे, आधार तक्रार निवारण अधिकारी महेंद्र पाटील म्हणाले.