चौकसभा घेण्यावर महाविकास आघाडीचे नेते मात्र ठाम
ठाणे : ठाणे पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत ठाकरे गटाकडून शहरात आयोजित करण्यात येत असलेल्या ‘होऊ दे चर्चा’ या चौकसभा घेण्यास मनाई केली आहे. या संदर्भात ठाणे पोलिसांनी नोटीसा बजावल्याने महाविकास आघाडीचे नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. पोलिसांना जी कारवाई करायची असेल ती त्यांनी करावी, आम्ही मात्र चौकसभा सुरूच ठेवणार आहोत, अशी भुमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहिर केली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि पोलिस यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून ठाणे शहराच्या विविध भागात ‘होऊ दे चर्चा’ या चौक सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या संभाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना फसव्या असल्याचे दावे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत. असे असतानाच, ठाणे पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत या चौक सभा घेण्यास मनाई केली असून तशा नोटीसा पोलिसांनी संबंधित आयोजकांना पाठविल्या आहेत. या नोटिसानंतर ठाकरे गटाच्या मदतीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते धावले आहेत. या तिन्ही पक्षांच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि पोलिसांवर टिका केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह तीन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ठाकरे गटाकडून राज्यभरात ‘होऊ दे चर्चा’ या चौक सभा घेतल्या जात आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील ६९ बेशिस्त रिक्षा चालकांचे परवाने रद्द होणार? चालकांनी थकवली ११ लाखाची दंडाची रक्कम
ठाणे शहरात १९९ चौक सभा झाल्या आहेत. या चौक सभांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावून सभा घेण्यास मनाई केली आहे. परंतु पोलिसांना इतके दिवस वाहतूक कोंडी दिसली नाही का? असा प्रश्न उपस्थित करत ही नोटीस नसून वटहूकूम असल्याची टिका आव्हाड यांनी केली. या चौकसभांना आणखी गर्दी होईल. पोलिसांना काय कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी. यापुढे आमच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी कारवाई केली तर महाविकास आघाडीचे सर्वजण पोलीस ठाण्यात येतील, असा इशाराही त्यांनी पोलिसांना यावेळी दिला. आम्ही घेत असलेल्या सर्व सभा कायदेशीरित्या सुरू होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पण आमच्या तक्रारींवर कुठेही कारवाई केली जात नाही. आमच्या चौक सभा शांततेत सुरु असताना आम्हाला नोटीस बजावली. पोलिसांनी १ ते १६ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. हे सरकार स्वत:ला हिंदुत्त्ववादी म्हणते. मग, मनाई आदेशाची नोटीस बजावून देवी आगमन मिरवणूका काढण्यावर बंदी कशी आणली, असा प्रश्न खासदार विचारे यांनी उपस्थित केला. एक फुल -दोन हाफ सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण एकत्र काम करणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या पत्रकार परिषदेआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांना भेटून निवेदन दिले असून त्यात चौक सभांना परवानगी देण्याती मागणी केली आहे. तसेच त्यांच्या कारभारावर निवदेनात टिकाही केली आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक मनोमिलन बैठक आम्ही घेणार
ठाण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक मनोमिलन बैठक आम्ही घेणार आहोत. या सभेला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते उपस्थित असतील अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.