अंबरनाथ : अंबरनाथमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेतील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे हटवत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अंबरनाथ शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, ठाकरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. रविवारी अंबरनाथ येथे आयोजित शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित छोटखानी बैठकीत हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्हा आणि त्यातही अंबरनाथ शहरात शिवसेनेचा दबदबा आहे. एकनाथ शिंदे यांची शहरावर एकहाती पकड आहे. त्यांच्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही पकड आणखी मजबूत केली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आमदार, माजी नगराध्यक्ष आणि काही माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी सोडल्यास एक मोठा गट त्यांना पाठिंबा देण्यापासून दूर राहिला होता. त्यात खुद्द शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा आणि नगरसेवक, तसेच पदाधिकारीही त्यांच्यासोबत शिंदेंपासून अंतर राखून होते. मात्र राजकीय परिस्थिती शिंदे यांच्याकडे झुकत असल्याचे दिसल्यानंतर शिवसेनेतील निष्ठावान आणि शहरात ताकद असलेले वाळेकर कुटुंबीय तसेच त्यांचे समर्थक शिंदे गटात सामील झाले. मात्र त्यानंतरही काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे गटासोबत होते.
हेही वाचा – ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट; ठाण्यातील काही भागांत बुधवारी पाणी नाही
विशेष म्हणजे शहराचे आमदार, खासदार, शहरप्रमुख, प्रमुख माजी नगरसेवक शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत सामील असतानाही अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेचा ताबा मात्र मोजक्या ठाकरे समर्थकांकडे होता. त्यामुळे या मोजक्या ठाकरे समर्थकांना कुणाची फूस आहे, असा प्रश्न निर्माण होत होता. त्यात अंबरनाथ शिवसेनेतील आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि अरविंद वाळेकर या दोन गटांतील अंतर्गत वादही कायम होते. त्यामुळे आगामी निवडणुका आणि अंबरनाथमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा महत्वाकांक्षी शिव मंदिर आर्ट फेस्टिवलच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळेकर आणि किणीकर यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी बैठक घेतल्याची माहिती शिवसेनेच्या खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्यानंतर वाळेकर यांनी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांना शिवसेनेत येण्याबाबत सांगितले. त्यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
रविवारी शिव मंदिर आर्ट फेस्टिवलच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत ठाकरे गटाचे पदाधिकारीही सामील झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यापूर्वी याच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शहर शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र काढले. तसेच यानंतर रात्री उशिरा अंबरनाथ येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यामुळे ठाकरे गटाचे उरले सुरले पदाधिकारीही शिवसेनेत गेल्याने अंबरनाथमध्ये ठाकरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे पहायला मिळत आहे.