कल्याण: कल्याण मधील मलंगगड परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जून मधील शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनेक कार्यकर्त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून माजी नगरसेवक महेश गायकवाड चार महिन्यांपासून प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गुरुवारी मलंगगड भागातील ठाकरे समर्थकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मलंगगड भागातील शिवसैनिकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटातील कल्याण, अंबरनाथ भागातील बहुतांशी कार्यकर्ते शिंदे गटात यापूर्वीच दाखल झाले आहेत.
हेही वाचा >>> Maharashtra News Live : सोमय्यांना डिवचण्यात रस नाही- हसन मुश्रीफ
मलंगगड परिसर हा कल्याण लोकसभेचा भाग आहे. या भागात शिवसेेनेचा प्रभाव आहे. खा. डाॅ. शिंदे यांच्या प्रयत्नातून या भागात अनेक विकास कामे झाली आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर या भागातील काही कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले होते. तर काही कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा आदर्श समोर ठेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा >>> ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानालगतच्या इमारतीतील १३ वर्षीय मुलीची आत्महत्या
कल्याण पूर्व भागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड चार महिन्यांपासून मलंगगड भागातील ठाकरे समर्थक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत होते. मलंग गड विभागातील वसारचे शाखाप्रमुख अशोक म्हात्रे, उपविभाग प्रमुख संजय फुलोरे, सुभाष गायकर, श्री मलंग बजरंग दलाचे प्रमुख राजेश गायकर, हरिष पावशे, रवी शेलार, शिवाजी भोईर, दीपक वायले, जोगेंद्र म्हात्रे, अक्षय म्हात्रे, अतुल म्हात्रे, जय वायले, काळू मढवी, ताराचंद सोनावणे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा >>> डोंबिवलीत एटीएम कार्डची अदलाबदल करुन २५ हजार रुपयांची फसवणूक
मलंग गड भागात पाणी, रस्ते, पूल, मलंगगड फ्युनिक्युलर ट्राॅली असे अनेक विषय मार्गी लागायचे आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, मलंग गड परिसरातील विकास कामे झटपट मार्गी लागावीत या उद्देशाने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केला आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनिकांमध्ये संघटन असावे या उद्देशातून कल्याण ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीण भागातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने संघटनात्मक बांधणीचे काम सुरू केले आहे.