ठाणे : पक्षातून फूटून गेलेल्या ४० आमदारांविरोधात उद्ध‌व ठाकरे यांनी आक्रमक प्रचार कराययचे ठरविले असून भिवंडी ग्रामीण मधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यात आपली पहिली जाहीर सभा घेणार आहेत. ठाकरे यांच्या पुढील नियोजनात कोपरी-पाचपाखाडी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातही सभा असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी, नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. भिवंडी ग्रामीण पट्ट्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. येथील शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात शिंदे यांच्या उमेदवारांविरोधात उमेदवार दिले आहेत. भिवंडी ग्रामीण मतदार संघातून ठाकरे गटाचे शिवसेना आदिवासी कक्षाचे कार्याध्यक्ष महादेव आंबो घाटाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा…भिवंडीत उद्धव सेनेच्या बंडखोराला काँग्रेस नेत्याची साथ

घाटाळ यांची शांताराम मोरे यांच्याविरोधात थेट लढत असणार आहे. या मतदारसंघात भाजपच्या स्नेहा देवेंद्र पाटील यांनी बंडखोरी केली असून त्यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्नेहा पाटील या काल्हेर भागात माजी सरपंच होत्या. स्नेहा पाटील यांच्या बंडखोरीने शांताराम मोरे यांची डोकेदुखी वाढली असताना आता उद्धव ठाकरे हे स्वत: ठाणे जिल्ह्यातील पहिली सभा भिवंडी ग्रामीण मतदारसंघात घेणार आहेत.

हेही वाचा…कल्याण ग्रामीणमध्ये कोणाचा झेंडा घेऊ हाती? प्रचारातील गोंधळामुळे शिवसेना, भाजपमधील कार्यकर्ते संभ्रमात

ठाणे शहरात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघातून ठाकरे गटाने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी देखील उद्धव ठाकरे यांच्या सभेचे नियोजन असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray campaign aggressively against 40 rebel mlas and hold meetings in bhiwandi rural sud 02