डोंबिवली – महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारानिमित्त डोंबिवलीत सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली होती. सोमवारी दुपारी चार वाजता शहर परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने सभा आयोजित भागशाळा मैदानात चिखल झाला. त्यामुळे सभा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिली. सभेची पुढची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा – बदलापुरात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस, वाऱ्याचा वेगही ताशी १०० किलोमीटरवर
हेही वाचा – Mumbai Rain : मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. दरेकर यांच्या प्रचारासाठी सोमवारी संध्याकाळी डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन केले होते. मंडप, व्यासपीठ, आसन व्यवस्था सुसज्ज करण्यात आली होती. दोन दिवस या सभेची तयारी पदाधिकाऱ्यांकडून सुरू होती. पक्षप्रमुख दुसऱ्यांदा शहरात येणार म्हणून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु, सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस डोंबिवली परिसरात सुरू झाला. या पावसाने मैदानात चिखल झाला. चिखल झालेल्या मैदानात सभा घेणे सोयीचे होणार नसल्याने ही सभा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला.