ठाणे: ठाकरे गटाला मागील काही महिन्यांपासून गळती लागली असताना ठाण्यात रविवारी पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणारे नौपाडा भागातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रकाश पायरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना फूटीनंतर ते ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. तसेच अनेक आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. पायरे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशामुळे ठाकरे यांना नौपाडा भागात फटका बसला आहे.

प्रकाश पायरे हे नौपाडा विभागातील जुने शिवसैनिक आहेत. शिवसेना फुटीनंतर ठाण्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु प्रकाश पायरे हे ठाकरे यांच्यासोबत कायम होते. नौपाडा भागात ते अत्यंत सक्रीय होते. प्रकाश पायरे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नौपाडा भागात ठाकरे यांच्या पक्षाला खिंडार पडले आहे. प्रकाश पायरे यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी देखील शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला आहे. प्रकाश पायरे हे ठाकरे गटात असताना अनेक आंदोलनामध्ये ते सक्रीय होते.

पक्षप्रवेशामुळे शोभा यात्रा विस्कळीत

श्री कौपिनेश्वर मंदिरापासून ते नौपाडा गोखले रोडपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शोभायात्रेत पायी सहभागी झाले होते. शोभा यात्रा नोपाडा भागात येताच, येथे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत उभारण्यात आलेल्या मंचावर प्रकाश पायरे यांचा पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामुळे मंचाच्या अवतीभवती, रस्त्यालगत पक्षातील कार्यकर्त्यांची तसेच नागरिकांची गर्दी झाली. यामुळे काही काळ यात्रा थांबविण्यात आली. दरम्यान काही चित्ररथ पुढे गेले तर, काही चित्ररथ मागे राहिल्याने या चित्ररथांमध्ये खूप अंतर निर्माण झाले आणि यात्रा विस्कळीत झाली.