उल्हासनगरः उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात लागलेली गळती थांबताना दिसत नाही. उल्हासनगर शहराचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिलीप गायकवाड यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका ज्योती गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनीही शिवेसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे उल्हासनगरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर त्यांना ठाणे जिल्ह्यातून चांगला पाठिंबा मिळाला. उल्हासनगर या शहरातूनही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र उल्हासनगर शहरातील जुने आणि निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे शिवसैनिक शिंदे यांच्यापासून अंतर राखून होते. यात माजी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचाही समावेश होता. मात्र त्यांनी महिनाभरापूर्वी शिंदे गटात प्रवेश घेत त्यांना पाठिंबा दिला. उल्हासनगरातील मराठी आणि निष्ठावंत शिवसैनिकांची वसाहत मानल्या जाणाऱ्या शहाड, गावठाण आणि कॅम्प एक परिसरात वर्चस्व असलेल्या दिलीप गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला नव्हता.

हेही वाचा >>> डोंबिवली : बेकायदा चाळीमुळे बाह्यवळण रस्ता अडचणीत?, आयरे गाव हरितपट्टा बाह्यवळण मार्गातील एक किलोमीटर टप्प्यात बेकायदा चाळी

निष्ठावंत म्हणून त्यांनी सुरूवातीला ठाकरे गटातच राहणे पसंत केले होते. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांना उल्हासनगर शहरप्रमुखपदी नियुक्त केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट शहरात तग धरून होता. मात्र शुक्रवारी दिलीप गायकवाड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलीप गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी नगरसेविका ज्योती गायकवाड विभाग संघटक सुनिल दबडे, उपविभाग प्रमुख हरीशचंद्र ओवळेकर,  उपशहर संघटक आनंद सावंत यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. गायकवाड यांच्या येण्याने कॅम्प एक भागातील बिर्गा गेट, शहाड गावठाण परिसरात शिवसेनेला बळ मिळणार आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील भजनभूषण नलिनी जोशी यांचे निधन

आणखी प्रवेशाची शक्यता

शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर  ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षप्रवेशांसह शिवसेनेते पदाधिकारी नेमणूकाही वेगाने केल्या जात आहेत. नुकतेच माजी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना महानगरप्रमुखपदी तर अरूण आशान यांना उपजिल्हाप्रमुखपदी नेमण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group ulhasnagar dilip gaikwad existing city chief joins shiv sena with former corporator ysh