ठाणे: मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासून होती, असा दावा एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे. आज त्यांच्याकडून गद्दारीची भाषा केली जाते. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कुणी केली हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. महाराष्ट्राच्या जनतेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत, भाजपसोबत त्याचवेळी यांनी बेईमानी केली होती. भाजपसोबत आपण राहिलो तर कधीच मुख्यमंत्री होता येणार नाही हे उद्धव यांना माहित होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे ठराविक हस्तकांकरवी त्यांनीच शरद पवारांना तसा निरोप पाठविला. आज ते म्हणतात मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. हे साफ खोटे आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा होतीच. हेही पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत होते. शिवसेनाप्रमुखांना कधीच सत्तेची लालसा नव्हती. त्यांना सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हायचा असे वाटायचे. शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. मी किमान पाच वेळा तरी त्यांना भाजपसोबत युती करा असे सांगितले होते. त्यांना ते मान्य नव्हते. कारण मुख्यमंत्री पदावर त्यांचा डोळा होता”, असे ते म्हणाले.
माझ्यावर दिल्लीचा कंट्रोल हा अपप्रचार
मुख्यमंत्री पदावर असूनही तुमच्यावर दिल्लीचा कंट्रोल असल्याची चर्चा असते या प्रश्नावर, “हे पुन्हा विरोधकांनी रचलेले कथानक आहे”, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. “एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा की मी तळागाळातील कार्यकर्ता आहे. मी शिवसेना कधीही कोणाच्या दावणीला बांधली नाही आणि बांधणार ही नाही. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात मी तळ ठोकून बसलो त्याबद्दल ते माझ्यावर टिका करतात. ही तुमच्यासारखा नाही. सभेला यायचे, भाषण करायची, मग घरी जाऊन झोपायचे या सवयी मला नाहीत. मी प्रत्येक निवडणूक माझ्या शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आलो आहे. मला माझ्या शिवसैनिकांसोबत रहायला आवडते. मी शिवसेना काँग्रेसच्या ताब्यात जाण्यापासून वाचवली. त्यामुळे माझ्यावर कुणाचा कंट्रोल आहे असे जर कुणी म्हणत असेल त्यांचा खोटा प्रचार माझे शिवसैनिक हाणून पाडतीलच,” असे शिंदे म्हणाले.
काँग्रेसपुढे लीन झालात, लवकर विलीनही व्हाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना उद्देशून शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत या असे आवाहन केले होते. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी याची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी काही दिवसांपुर्वी सर्व प्रादेशिक पक्ष या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य केले होते. नरेंद्र मोदी यांच्या विधानाला ही पार्श्वभूमी होती असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. “शरद पवार काहीही म्हणोत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्ष आधीच काँग्रेसपुढे लीन केला आहे. उद्धव काँग्रससमोर लीन झाले आहेतच; लवकर विलीनही होतील”, अशी मल्लिनाथी शिंदे यांनी केली..
जागा वाटपात संघर्ष नव्हता आणि आताही नाही
महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. जागा पदरात पाडून घेताना तुम्हाला झुंजावे लागले का या प्रश्नावर असा कोणताही संघर्ष नव्हता असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. “कोणी कोणत्या जागा लढवायच्या याची महायुतीमधील घटक पक्षांना पुर्ण कल्पना होती. त्यामुळे संघर्ष वगैरे काहीही नव्हता. निवडणूक लढविताना काही गणिते जुळवावी लागतात. त्यामुळेच १५ जागा पदरात पाडून घेण्यात मी यशस्वी ठरलो, मुख्यमंत्र्यांचा मुसद्दीपणाचा विजय वगैरे बातम्या तुम्ही चालविल्यात. आमचे व्यवस्थित सगळे ठरले होते. जागा वाटपातील जय, पराजय हे तुमच्या मनाचे मांडे आहेत. आमचे लक्ष्य लोकसभा निवडणुकीतील एकत्रित, संघटीत विजयाचे होते हे ध्यानात घ्या,” असे शिंदे म्हणाले.
ठाणे विक्रमी मतांनी जिंकू
तुमचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजपने इतका आग्रह धरणे तुम्हाला पटले का, या प्रश्नावर “एखाद्या जागेवर आग्रह धरणे हा त्यात्या पक्षाचा अधिकार असतो”, असे उ त्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. कोणी कोणत्या जागेसाठी आग्रह धरला हा विषय आता मागे पडला आहे. जागा ठरल्या, उमेदवार ठरला. आता आम्ही एकदिलाने काम करत आहोत. भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक, त्यांचे पुत्र संजीव आणि संदीप पुर्ण ताकदीने ठाण्याची जागा जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ‘नरेश म्हस्के माझा जुना कार्यकर्ता आहे’ असे वक्तव्य स्वत: नाईक यांनी केले आहे. ठाणे हा राष्ट्रभक्ती विचारांनी भारलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राष्ट्रभक्तीने प्रेरीत असलेले नागरिक रहातात. रामभाउ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या थोर नेत्यांनी खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ठाण्यात कोणी कसलाही प्रचार करो, हा मतदारसंघ आम्ही विक्रमी मतांनी जिंकू”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लगतच असलेल्या कल्याणात श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पावती तेथील मतदार त्यांना देतील. श्रीकांत यांनी केलेल्या कामाचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
मोदींना जितक्या शिव्या द्याल तितके ते अधिक जागा मिळवतील
नरेंद्र मोदी यांना शिव्या देण्याचा एकमेव कार्यक्रम विरोधकांपुढे उरला आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदींचा उल्लेख विरोधकांनी ‘मौत का सौदागर’ असा केला. गेल्या निवडणुकीत ‘चौकीदार चोर है’ असे ही मंडळी म्हणत. आता तडीपार वगैरेसारखी खालची भाषा वापरत आहात. एक गोष्ट लक्षात घ्या विरोधक मोदींना जितक्या शिव्या देतील तितके लोकांचे समर्थन त्यांना वाढत जाईल. आधी २०१४, २०१९ मध्ये काय झाले हे विरोधकांनी पाहीले आहेत. यावेळीही मोदी रेकॉर्ड ब्रेक जागांनी निवडणून येतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
भगवा नकोसे झालेल्यांना मतदार जागा दाखवतील
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भगवा ध्वज जीव की प्राण होता. पण आज उध्दव ठाकरे यांच्या भाषणातून, प्रचारातून, मिरवणुकांमधून भगवा ध्वज गायब झाला आहे. विशिष्ट समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांना हिंदुत्व नकोसे झाले आहे. अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रविचाराने प्रेरीत असलेल्या संघटनेवर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तेव्हा आता मुंबई, ठाणेकर त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
“महाराष्ट्रात महायुतीला विरोधक कडवी लढत देत आहेत असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले गेले. ठराविक वर्ग नाराज असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला गेला. राज्यातील काही मतदारसंघात महायुतीला आव्हान आहे असे वातावरण उभे केले गेले. हे कसे खोटे आणि चुकीचे होते याचे उत्तर सर्वांना येत्या चार जून रोजी मिळेलच”, असे मुख्यमंत्री म्हणाले. “ मी दाव्याने सांगतो; राज्यात झालेल्या पाचही टप्प्यांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे ठामपणे उभा आहे. मुंबई महानगर पट्टयातही काही वेगळी परिस्थिती नाही. येथेही आम्ही विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारांपुढे जात आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या किमान ४५ जागा निवडून येतीलच शिवाय मुंबई महानगर पट्टयातील सर्वच्या सर्व १० जागांवर शिवसेना-भाजपला विजय मिळेल”, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
त्यांना हिंदुत्व नकोसे
“पाकिस्तानचा झेंडा प्रचार मिरवणुकांमध्ये नाचवायचा आणि भगव्याच्या नावाने बोटे मोडायची. द्रेशद्रोह्यांना निवडणूक प्रचारात फिरवायचे आणि देशभक्त संघटनांना शिव्याशाप द्यायचे. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसच्या गळ्यात गळे घालायचे. ठराविक व्होट बँकेची मतं मिळवण्यासाठी आणखी किती लांगूलचालन करणार ,” असा प्रश्न शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना केला. भगवी पताका हे सनातन हिंदू धर्माचे प्रतिक आहे. हा भगवा प्रभू श्रीरामाचा आहे. हा भगवा शिवरायांचा आहे. हा भगवा वारकऱ्यांचा आहे. हा भगवा शिवसेनेचाही आहे. त्यामुळेच भगव्याचा अपमान करणाऱ्यांना जनता मतपेट्यांमधून धडा शिकवेल असे मुख्यमंत्री शिंदे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटास उद्देशून म्हणाले. “ शिवसेना आमच्याकडे आहे आणि ‘शिव्या’सेना त्यांच्याकडे आहे असेही ते म्हणाले. विरोधासाठी कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने ते गुद्यावर आली”, अशी टिप्पणी त्यांनी केली.
आता लक्ष्य केवळ लोकसभा ….
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत राज्यात भाजप हाच मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केले होते. फडणवीस यांचे वक्तव्य तसेच राज ठाकरे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा, विधानसभा निवडणुकीत जागा वाटपासंबंधीची समीकरणे यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अधिक जागा निवडून आणण्याचे एकमेव लक्ष्य आता आमच्यापुढे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. “पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार आमच्या मनाला शिवतही नाही. शिवसेना-भाजप ही २५ वर्षांची जुनी मैत्री आहे. ही नैसर्गिक युती आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून आणताना महाराष्ट्रातील अधिकाधिक जागांची साथ त्यांना मिळायला हवी या एकमेव विचाराने आम्ही काम करत आहोत,” असे शिंदे म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही समर्थन देत असताना मोदींवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे विधानसभेची समीकरणे काय असतील, कोणाला किती जागा मिळतील असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील; पण आमचे लक्ष्य लोकसभा आहे आणि लक्ष्यभेद आम्ही करणारच असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो….
महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या एकाधिकारशाहीला शिवसेनेतील अनेक आमदार कंटाळले होते असे तुम्ही म्हणाला होतात. मग महायुतीत तुम्हाला अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसे चालतात असे विचारता “तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो” असे उत्तर शिंदे यांनी दिले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी ते समन्वयाने चालते. महाविकास आघाडीत परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत. हा फरक समजून घ्यायला हवा, असे शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी होती. पक्ष कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, आमदारांशी त्यांचा संपर्क नव्हता. कोवीड काळात पाणी उकळून प्या इतकाच सल्ला आमदारांना दिला जायचा. आमदार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तेथील लोकांचे, समाजाचे प्रश्न ऐकून घ्यायला त्यांना वेळ नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री म्हणून मी लोकांमध्ये जातो. आमदारांशी चर्चा करतो. प्रश्न समजून घेतो, ते सोडविण्यासाठी तातडीने निर्णय घेतो. तळागाळातील लोकांना हा फरक समजतो आहे, असाही दावा त्यांनी केला.
मोदींचे पंतप्रधान होणे महाराष्ट्रासाठी आवश्यक
“देशात सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार हे स्पष्टच आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदींना साथ देणे महत्वाचे आहे. राज्याच्या विकासात केंद्र सरकारची नेहमीच महत्वाची भूमिका असते. राज्याचे अनेक प्रश्न गेल्या दोन वर्षात मोदी सरकारमुळे मार्गी लावण्यात आम्हाला यश आले आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले आहेत. मुंबईत मेट्रो, रस्त्यांची कामे वेगाने सुरु झाली आहेत. नवी मुंबई विमानतळाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरु होतो आहे. मुंबई, ठाणेकरांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी हे सरकार धडपडत आहे हे येथील नागरिक पहात आहेत. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असताना सुरु झालेले अनेक प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडले. यातील अनेक प्रकल्प पुन्हा वेगाने सुरु झाले आहे आणि नव्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. मुंबईकर पहातोय, कोण त्यांच्यासाठी काम करतो आहे. त्यामुळे मुंबई महानगर पट्टयात सर्व जागांवर आम्हाला विजय मिळेल ही खात्री आहे”, असे प्रतिपादन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केले.
गडचिरोलीतही उद्योग येत आहेत
राज्यातील उद्योग गुजरातला पळविले जात आहे हा विरोधकांचा प्रचार मुळात हास्यास्पद आहे, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे. “वेदांतसारखा मोठा प्रकल्प जेव्हा गुजरातला गेला तेव्हा सत्तेत येऊन आम्हाला दोन महिनेही झाले नव्हते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नकारात्मकतेमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला. आमच्या सरकारच्या काळात राज्याला उद्योगस्नेही बनविण्यासाठी आम्ही ठोस धोरणे आखली. गेल्या दोन वर्षात पाच हजार कोटींची गुंतवणुक महाराष्ट्रात आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यामधे टाटा, जिंदाल सारखे उद्योग समूह उद्योग थाटण्यासाठी पुढे येत आहेत. पुर्वी एखादा प्रकल्प राज्यात आणताना ‘माझे काय’ असे त्यांची भूमीका असायची. हे चित्र आम्ही बदलले आहे,” असे शिंदे म्हणाले.