ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. तसेच शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले होते. शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शनिवारी उद्धव ठाकरे मुंब्रा शहरात येणार आहे. त्यामुळे आता हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंब्रा शहरात २००१ मध्ये रुंदीकरणानंतर शंकर मंदिर परिसरात शिवसेनेची मध्यवर्ती शाखा सुरू झाली होती. मुंब्रा शहरातील शिवसेनेची ही सर्वात जुनी शाखा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. बहुसंख्य नगरसेवक शिंदे यांच्यासोबत आहेत. नगरसेवक मोठ्या प्रमाणार शिंदे गटासोबत असले तरी काही पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहीले आहेत. मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखेत ठाकरे गटाचे पदाधिकारी शाखेत बसत होते. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी शाखेत असतानाही शिंदे समर्थक त्याठिकाणी आले. शाखेतील पदाधिकारी बाहेर निघाल्यानंतर त्यांनी ही शाखा जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. गुंडगिरी करून शिंदे गटाने हे कृत्य केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. तर आम्ही नव्याने येथे शाखा उभारत असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे.

हेही वाचा >>>रेल्वे अधिकाऱ्यांच्या चतुराईमुळे मोबाईल चोर अटकेत; कोपर रेल्वे स्थानकातील प्रकार

त्यातच आता उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्रा शहरात शाखेच्या ठिकाणी भेट द्यायला येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते. त्यांनी शिंदे गट आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शनिवारी उद्ध‌व ठाकरे काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray in mumbra town after the shinde faction demolished the branch amy
Show comments