शिवसेना-भाजप नावाने मते मागवून सत्तेच्या खुर्चीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मूठमाती देणारे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच पहिले आणि खरे गद्दार आहेत. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा सौदा, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उध्दव ठाकरे यांनी केले, असा घाणघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाजनसंपर्क अभियानांतर्गत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी कल्याण मधील फडके अभियान येथे जन संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाजपचे राज्य प्रभारी सी. टी. रवी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> ठाण्यातील सावरकनगरमध्ये जलवाहिनीला गळती; पाणी कपातीच्या काळातही पालिकेचे जलवाहिन्यांच्या गळतीकडे दुर्लक्ष

शिवसेनेचे दोन वर्धापनदिन सोमवारी मुंबईत होत आहेत. एकाने बाळासाहेबांचे विचार बुडविले ते उध्दव ठाकरे आणि शिवसेना वाचविण्याचे काम ज्यांनी केले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा दोघांचे हे कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जाण्याची वेळ आली तर शिवसेनेचे दुकान बंद करुन टाकीन, असे उत्तर शिवसेनाप्रमुखांनी यापूर्वी दिले होते. सत्तेसाठी उध्दव ठाकरे यांनी आ जा करत भाजपला लोटून आघाडीबरोबर घरोबा केला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना मूठमाती दिली. हिंदुत्वासाठी मते मागवून सत्तेच्या खुर्चीसाठी उध्दव ठाकरे यांनी पहिली आणि खरी गद्दारी केली, असा आरोप फडणवीस यांनी केला.

खोके, गद्दार म्हणून उध्दव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिणवतात. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी भाजपबरोबर संधान साधले. त्यांच्या सोबतच्या ४० लोकांना काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरची आघाडी मान्य नव्हती, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> ठाण्याच्या मनोरुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा केला निषेध

दररोज शिव्या घालूनही जनता मोदींच्या पाठीशी धावत आहे. ही मळमळ उध्दव ठाकरे यांच्या रविवारच्या भाषणातून ओकारीसारखी बाहेर पडली. जळीस्थळी उध्दव ठाकरे यांना मुघल काळातील संताजी-धनाजी सारखे नरेंद्र मोदी, अमित शहा दिसू लागले आहेत. अडीच वर्षाच्या काळात मंत्रालयात दोन वेळा जाणारा मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांची महती आत्मचरित्रात मांडली आहे. मोदींचा विकास कामांसाठी सर्वदूर संचार सुरू आहे. उध्दव ठाकरे वरळीतील शिवसैनिकांना भेटत नव्हते. महासाथीच्या काळात कुंभकर्णी झोपेत असलेले उध्दव ठाकरे झोपेतून बाहेरच आलेच नाहीत. दाऊद प्रकरणावरुन नवाब मलिक तुरुंगात गेले. त्याचा निषेध उध्दव यांनी केला नाही. खोके, गद्दारीचा आता टाहो फोडता, तुम्ही काय केले आहे आता ते मुंबई पालिकेतील कॅगने ताशेरे ओढलेल्या १२ हजार ५०० कोटीच्या घोटाळ्यातून बाहेर येईल. जनतेचा पैसा घरच्या तिजोरीत नेलाय तो परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिकेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. पालिका तिजोरीतील पैपै परत आणू, असा इशारा फडणवीस यांनी दिला. उध्दव ठाकरे यांनी रोखून धरलेली सर्व विकास कामे आता जोमाने सुरू आहेत. मोदींनी राज्यासाठी चार लाख कोटीची कामे मंजूर केली आहेत. हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी, भारताला परमोच्च ठिकाणी नेण्यासठी मोदींच्या पाठीशी राहण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray is the first and real traitor says dcm devendra fadnavis in kalyan zws
Show comments