कल्याण: ज्यांना शिवसेना पक्षाने पाळले, पोसले आणि पाजले आणि सर्व काही दिले. असे सर्व काही घेऊन खाऊन माजविलेल्यांनी नंतर आपला माज पक्षाच्याच पाठीत खंजीर खुपसण्यात केला. अशा माज चढलेल्यांचा माज येत्या निवडणुकांमध्ये उतरवू, असा इशारा कल्याण मधील ‘उबाठा’चे शिवसेना उपनेते विजय साळवी यांंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सोमवारी दिला. त्यांच्या भाषणाचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होता.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येत्या शनिवारी कल्याण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी कल्याण दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील आयोजित बैठकीत उपनेते विजय साळवी बोलत होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे केवळ कल्याण शहराच्या दौऱ्यावर नाही तर ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी ज्यांनी खंजीर खुपसून पळ काढला त्यांचा माज या दौऱ्याच्या माध्यमातून उतरविला जाईल, असा इशारा साळवी यांनी दिला. या बैठकीत साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यावर आगपाखड केली.
हेही वाचा… कल्याणमध्ये पत्नी, मुलाची हत्या करणाऱ्या पतीकडून ७०० लोकांची ४० कोटीची फसवणूक
कल्याण लोकसभेसाठी पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे आले, त्यावेळी शिवसैनिकांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्येष्ठ अनुभवी उमेदवार असताना हा नवखा उमेदवार काय करणार, असा प्रश्न त्यावेळी शिवसैनिकांचा होता. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या शिक्षणाकडे आणि ते डाॅक्टर असल्याने त्यांना उमेदवारी दिली. त्यांना सुरूवातीला साधे भाषणही करता येत नव्हते, असे विजय साळवी यांनी सांगितले.
नवखा उमेदवार असुनही पक्षप्रमुखाच्या आदेशावरून श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी उन्हाची, पाण्याची पर्वा न करता घाम गाळून श्रीकांत शिंदेे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणले. अशी गद्दारी करून देण्यासाठी आपण त्यांना त्यावेळी निवडून आणले का, घाम गाळला का, याचा विचार आता प्रत्येक शिवसैनिकाने करावा. ही ज्वाला आता प्रत्येक शिवसैनिकाच्या हद्यात भिडली पाहिजे. हाच संदेश घेऊन आता येत्या निवडणुकीत फुटीरांना धडा शिकवण्यासाठी आपण आक्रमकपणे काम केले पाहिजे, असे साळवी यांंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
पक्षप्रमुखांनी विश्वास टाकत यांच्यावर सत्तेची जबाबदारी दिली. तर यांनी अमाप माया गोळा केली आणि त्या मायेचा वापर खंजीर खुपसण्यासाठी केला. हा प्रत्येक शिवसैनिकाला दिलेला दगा आहे, अशी टीका साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केली. मराठी अस्मितेसाठी आतापर्यंत शिवसैनिकांंनी घरादारांंवर तळुशीपत्रे ठेवली. अनेक कुटुंंब उद्धवस्त झाली. अशा संघटनेला संपविण्याचे काम आता काही गद्दार करत असल्याचा निशाणा साळवी यांनी साधला. शिवसेनेवर घाला घालण्याचे काम जे आता करत आहेत त्यांना येत्या निवडणुकीत चारीमुंड्या चित करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन उपनेते साळवी यांनी केले. साळवी यांच्या प्रत्येक शब्दाला शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जात होता.