ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यातील महाविकास आघाडीचे उमदेवार राजन विचारे यांचे समर्थक आणि नवी मुंबईमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मनोहर मढवी उर्फ एमके यांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी खंडणी प्रकरणात अटक केली. कळव्यातील एका केबल व्यावसायिकांकडून अडीच लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी मढवी यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे ठाणे आणि नवी मुंबई शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेतील उठावानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली तर, राजन विचारे यांच्यासह नवी मुंबईतील माजी नगरसेवक मनोहर मढवी यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले. माजी नगरसेवक मनोहर मढवी हे नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर ठाणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांचे समर्थक म्हणूनही ते ओळखले जातात. ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून २० मे रोजी मतदान होणार आहे. ६ मे पासून प्रचाराचा जोर वाढणार असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच मनोहर मढवी यांना अडीच लाखांची खंडणी घेताना ठाणे पोलिसांनी रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली असून त्यांची अटक ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे..
कळव्यातील एका केबल व्यवसायिकाकडे मढवी यांनी अडीच लाखांची खंडणी मागितली होती. त्यापैकी दीड लाख रुपये त्यांनी शुक्रवारी घेतले होते तर, एक लाख रुपये शनिवारी देण्यास सांगितले होते. याबाबत केबल व्यावसायिकाने ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार केली होती. दरम्यान मढवी यांनी केबल व्यावसायिकाला एक लाख रूपये घेऊन ऐरोली येथील कार्यालयात बोलावले होते. तिथे ठाणे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मढवी यांना एक लाखांची खंडणी घेताना रंगेहात पकडले, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष कृती दलाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली.
यापुर्वीही तडीपारची कारवाई
वर्षभरापुर्वी नवी मुंबई पोलिसांनी मनोहर मढवी यांना ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांपुर्वी तडीपार केले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गणेश उत्सव काळात दाखल झालेले गुन्हे यामुळे नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली होती. तर, हा निर्णय पोलिसांचा नसून राजकीय असल्याचा आरोप मढवी यांनी त्यावेळी केला होता. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. उच्च न्यायालयाने तडीपार निर्णयाला स्थगिती दिली होती.