कल्याण: कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी भागात गेल्या सतरा वर्षापासून एका भूखंडावर असलेली ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या समर्थकांची शिवसेना शाखा शनिवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या जे प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. यावेळी ठाकरे समर्थकांनी शाखेच्या ठिकाणी येऊन पालिकेच्या विरोधात निदर्शने केली.राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळेच पालिकेनेही ही कारवाई केली आहे. मागील १७ वर्षात ज्या शाखेवर कधी कोणी अनधिकृत म्हणून कारवाई केली नाही ती शाखा आता पालिकेला आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना अनधिकृत कशी वाटू लागली, असे प्रश्न उपस्थित करत उध्दव ठाकरे समर्थकांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुत्र खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विठ्ठलवाडी भागात उध्दव ठाकरे समर्थक कार्यकर्ते रमाकांत देवळेकर यांच्या पुढाकाराने अनेक वर्ष शिवसेना शाखा आहे. या शाखेतून जनसंपर्काची कामे केली जातात. एका बगीचाच्या राखीव भूखंडाच्या भागावर इतर बांधकामांमध्ये ही शाखा आहे. या भूखंडाचा मालक पालिकेकडे अनेक वर्ष आपला मोबदला द्या आणि भूखंडाचा ताबा घ्या म्हणून पालिकेत फेऱ्या मारत आहे. परंतु, पालिका अधिकारी त्याला दाद देत नाहीत. अशी परिस्थिती असताना अचानक या भूखंडाच्या बाजुला असलेली शिवसेना शाखा (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पालिकेला अनधिकृत का वाटली, असे प्रश्न ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी केले.

हेही वाचा: ”एकनाथ शिंदेंना आम्हीही निवडून दिलय”, ठाण्यात शिंदे-ठाकरे गटामध्ये शाब्दिक बाचाबाची

पालिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ शाखेच्या बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे शिवसैनिकांनी सांगितले. यावेळी रमाकांत देवळेकर, महिला आघाडीच्या विजया पोटे, आशा रसाळ अनेक महिला, पुरुष यावेळी उपस्थित होते. रमाकांत देवळेकर यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेशासाठी खूप दबाव होता. त्यांच्या शाखेच्या जागेवर शिंदे समर्थकांचा डोळा होता. त्यांनी त्यास दाद दिली नाही. त्या रागातून आणि आकसाने ही कारवाई केली आहे, असे पदाधिकारी देवळेकर यांनी सांगितले. दबावाचे राजकारण करुन राजकारण यशस्वी होत नसते याची खूणगाठ संबंधितांनी बांधून ठेवावी, असे आव्हान ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी सत्ताधारी शिंदे यांच्या पक्षाला दिले आहे.

हेही वाचा: डोंबिवली: हिरकणी प्रतिष्ठानच्या सायकल स्पर्धेत ६४ वर्षाच्या आजीबाईंनी चालवली सायकल

३९ गुंठे क्षेत्र असलेल्या बगिचा आरक्षणावरील सर्व अनधिकृत बांधकामे हटवून पालिकेने याठिकाणी सुंदर बगिचा विकसित करावा, अशी मागणी कल्याण शहर प्रमुख शरद पाटील यांनी केली आहे. या बांधकामासह इतर चार बांधकामधारकांना बांधकामे हटविण्यासाठी यापूर्वी नोटीस दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अचानक ही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती जे प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी दिली. डोंबिवली मध्यवर्ति शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन खा. शिंदे यांनी बरीच खळखळ केली. अखेर त्या शाखेचा ताबा घेतला. आता कल्याणमध्ये ठाकरे समर्थक दाद देत नाही म्हणून शाखाच जमीनदोस्त केल्याने ठाकरे समर्थक संतप्त झाले आहेत. शिंदे समर्थकांनी मात्र यात मुख्यमंत्री, खासदार यांचा कोणताही संबंध नाही. पालिकेने त्यांच्या अधिकारात बेकायदा बांधकाम कारवाई केली आहे, असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray supporter kalyan east branch razed land by municipality eknath shinde shrikant shinde thane tmb 01