ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असून या उत्सवाला गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर ठाकरे गटाकडून देवीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या उत्सवाला उपस्थिती लावण्याआधी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्ताबदलाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे जिल्ह्याचे गेल्या तीन महिन्यात राजकीय दृष्ट्या महत्व वाढले आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविली. त्यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याचे काम केले. तसेच दिघे यांनी टेंभीनाक्यावर सुरु केलेल्या दहीहंडी आणि नवरात्रौत्सवाची परंपरा कायम ठेवली. त्यांना जिल्ह्यात मानणारा मोठा वर्ग असून यामुळे शिवसेनेतील बंडखोरीनंतर त्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाल्याचे दिसून आले आहे. यंदा टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम केल्याच्या कारणावरून ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टिका करण्यात आली होती.

या उत्सवाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कुटूंबिय हजेरी लावून देवीचे दर्शन घेतात. त्यादरम्यान ते महाआरतीही करतात. त्याचप्रमाणे यंदाही रश्मी ठाकरे या गुरुवारी देवीच्या दर्शनासाठी येणार होत्या आणि त्यांच्या हस्ते आरती होणार होती. परंतु त्याचवेळी शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले. यामुळे देवीच्या मंडपात ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर हा वाद टाळण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्या देवीच्या दर्शनाची वेळ बदलण्यात आली. त्यानुसार त्यांनी दुपारी ४.३० वाजता देवीचे दर्शन घेत महाआरती केली. यावेळी ठाकरे गटाने देवीच्या मंडपात तसेच परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. मुंबईतून महिला आघाडी बसगाड्यांमधून त्याठिकाणी आल्या होत्या. माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे, खासदार प्रियंका चतुर्वेदी या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्या ठाण्यात आल्या होत्या. तसेच शिवसेनेचे खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे हेही उपस्थित होते. महाआरतीनंतर यावेळी महिला शिवसेनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray supporters show power strength in thane tembhi naka during navratri festival zws