ठाणे : राज्यातील सरकारने पोलिसांना आधी वारकऱ्यांवर, त्यानंतर मराठा आंदोलकांवर हल्ला करायला लावला आणि आता मुंब्य्रात शाखा चोरांचे संरक्षण करायला लावले आहे. मी राज्यातील पोलिसांना दोष देत नसून ते हतबल आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात केली. हिम्मत असेल तर पोलीस संरक्षण बाजूला ठेवून भिडा, असे खुले आव्हान शिंदे गटाला देत राज्यात जिथे या चोरांची गुंडागर्दी दिसेल, तिथे जाब विचारण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
शिंदे गटाकडून जमीनदोस्त करण्यात आलेल्या मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखेला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी दुपारी आले होते. याठिकाणी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांना आवाहन केले. सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आमचे बॅनर फाडल्याचे कळले. पण, निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो, असा इशारा त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे दिला. शाखेला भेट देणार असल्याचे मी दोन दिवस आधीच जाहीर केले होते. पोलिसांनी तिकडे भाडोत्री गुंडांना येऊ द्यायला नको होते पण, पोलिसांनी त्यांना तिथे येऊ दिले. पोलिसांचे धन्यवाद मानतो. कारण, त्यांनी शाखाचोरांचे रक्षण केले. प्रशासन हतबल झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच महाराष्ट्राची अब्रू घालवली आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>>VIDEO : ठाण्यात वातावरण तापलं, उद्धव ठाकरेंचे ९० टक्के बॅनर्स फाडले; पोलिसांवर आरोप करत आव्हाड म्हणाले…
मुंब्य्रातील दौऱ्यानंतर त्यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर टीका केली. राज्यातील सरकारने पोलिसांना आधी वारकऱ्यांवर, त्यानंतर मराठा आंदोलकांवर हल्ला करायला लावला आणि आता मुंब्य्रात शाखाचोरांचे संरक्षण करायला लावले आहे. मी राज्यातील पोलिसांना दोष देत नसून ते हतबल आहेत, अशी टीका त्यांनी केली. खोके सरकारने आमची शाखा पाडून एक खोका अडकवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. तो खोका लवकरात लवकर उचलावा. अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देऊ. तुमच्या हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला सारून समोर या, असे आव्हानही त्यांनी शिंदे गटाला दिले आहे. दिवाळीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही संयम बाळगला
ठाण्यात ठाकरेंचे शक्तीप्रदर्शन
मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. अशात उद्धव ठाकरे हे शनिवारी त्या शाखेला भेट देण्यासाठी आले होते. त्यापुर्वी आनंदनगर चेक नाका, कळवा नाका, रेतीबंदर आणि मुंब्य्रात काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. या वादाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर शिंदे गटानेही शाखा परिसरात शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>>ठाणे : उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आव्हाडांची बॅनरबाजी
मुंब्य्राला पोलीस छावणीचे स्वरूप
मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा परिसरात शिंदेच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के आणि कार्यकर्ते शाखा परिसरात तळ ठोकून बसले होते. तर, उद्धव ठाकरे हे येणार म्हणून त्यांचे समर्थकही परिसरात जमले होते. दोन्ही गटाकडून घोषणाबाजी सुरू होती. परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेत जाण्यापासून रोखले. त्यांचे समर्थक मात्र शाखेत जाण्यासाठी आग्रह धरत होते. त्याचदरम्यान, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. मुंब्र्यात एकूण पाचशेपेक्षा जास्त पोलीस, राज्य राखीव दलाच्या तीन तुकडय़ा, दोन दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांना आव्हाड यांची साथ
शिंदे गटाकडून जमीनदोस्त करण्यात आलेली मध्यवर्ती शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंब्रा परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे होतेच पण, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) कळवा मुंब्रा विभागाचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही पूर्ण दौऱ्यात उपस्थित होते. उद्धव यांच्या स्वागताचे फलकही त्यांनी लावले होते. ते फलक फाडण्यात आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला होता. कळवापासून ते मुंब्य्रात उद्धव यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले, त्याचे नियोजन आव्हाड यांनी केल्याचे समजते. शिवसेनेतील फुटीनंतर खासदार विचारे यांनी उद्धव यांची साथ दिली असली तरी उद्धव यांच्याकडे ठाणे जिल्ह्यात नेतृत्व नसल्याची टीका विरोधकांकडून होत होती. त्यातच मुंब्रा दौऱ्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आव्हाड हे उद्धव याच्यासोबत दिसून आले. यानिमित्ताने राजकीय वर्तुळात वेगवेगळय़ा चर्चा सुरू झाल्या.
(मुंब्य्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.)