कल्याण– शिवसेनेतील फुटीनंतर गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत कल्याणमध्ये प्रथमच आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे शुक्रवारी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. निष्ठावान शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, हे दाखविण्यासाठी शिवसेना ‘उबाठा’ पक्षातर्फे रश्मी ठाकरे यांच्या समोर शिवसैनिकांनी गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन केले. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे शहरात श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे शुक्रवारी सकाळी कल्याणमध्ये आल्या होत्या. महिला आघाडीच्या विजया पोटे यांनी त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा >>> लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी शाळांमध्ये समुपदेशन शिबिर घ्या; डोंबिवली महिला महासंघाची साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे मागणी
कल्याण शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाकरे परिवारातील नेता कल्याणकडे फिरकला नव्हता. ती सुरुवात रश्मी ठाकरे यांनी करुन दिली आहे. कल्याण मधील जुना निष्ठावान शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहे. काही वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे वास्तव्य कल्याणमध्ये होते. त्यामुळे ठाकरे परिवाराचे कल्याणशी घट्ट नाते आहे. रश्मी ठाकरे कल्याणमध्ये आल्याने महिला आघाडीत उत्साह संचारला होता. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जयघोषाच्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. श्रावणसरी कार्यक्रमात ‘बाई पण भारी देवा’ हे गाणे तालासुरात सुरू होताच, उपस्थित महिला आघाडीच्या शिवसैनिकांनी ठेका धरला. त्याला रश्मी ठाकरे यांनी हात उंचावून साथ दिली.