ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले आणि शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे उद्धवराव जगताप यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या दरबारात हजेरी लावली. निमित्त होते मित्राच्या मुलाला नोकरी… विशेष म्हणजे, गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर दिघे आणि नाईकांच्या राजकीय वैराबाबत नेहमी जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा होत असतात. नाईकांच्या दरबारात शिवसेनेचे उद्धवराव आल्याने अनेकंच्या भुवया उंचावल्या. परंतु नाईक यांनी उद्धवरावांचा सत्कार करत उपस्थित छायाचित्रकारांना सोबत फोटो काढण्याची विनंती केली. तसेच ‘हे माझे जुने सहकारी’ म्हणत, त्यांच्या मित्राच्या मुलाला नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे उद्धवराव जगताप हे अत्यंत जवळचे सहकारी होते. ठाण्यातील जेवढ्या शिवसेना शाखा आहेत तेवढ्या शाखा उद्धवराव जगताप यांच्या नावावर आहेत. मुंब्रा येथील वादग्रस्त शाखा देखील उद्धवरावांच्या नावावर होती. याच शाखेमुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथे आले होते. या शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांच्या समोर आले होते. उद्धवराव जगताप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने ठाण्यातील बऱ्यापैकी शाखा ह्या शिंदे गटाकडे आहेत. ‘धर्मवीर आनंद दिघे, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात देखील उद्धवराव जगताप यांचे भूमिका ठळकपणे दर्शविण्यात आली होती. टेंभीनाका येथील आनंद आश्रमचा कारभार देखील उद्धवराव सांभाळत असे. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात नोकरी निमित्ताने येणाऱ्यांच्या अनेक नेमणूकाही उद्धवरावांनी केल्या आहेत. दरम्यान, गणेश नाईक हे देखील शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते होते. १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दिघे आणि नाईक यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रुत होते. त्यावेळी निवडणूकीत त्यांचा पराभवही झाला होता. हा पराभव गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागला होता.

उद्धवराव आणि गणेश नाईक भेट

– आनंद दिघे हयात नसताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची सुत्र गेली होती. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. उद्धवराव जगताप हे देखील त्यांच्यासोबत आहेत. सध्या उद्धवराव ९८ वर्षांचे आहेत. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर येथील नाट्यगृहात गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. गणेश नाईक यांच्यासमोर उद्धवराव येताच, नाईक यांनी ‘किती दिवसांनी भेट झाली म्हणत, त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्यासोबत एक छायाचित्र काढले. उद्धवराव हे त्यांच्या एका मित्राच्या मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी आले होते. याबाबत उद्दवरावांना विचारले असता, त्यांनी सांगितले की आम्ही एकाच संघटनेसाठी पूर्वी काम केले होते. खूप दिवसांनी भेटल्यानंतर दोघांनाही आनंद झाला.