ठाणे : होळी सणानिमित्ताने ‘यु.के.’हून ठाण्यात मित्राच्या घरी आलेल्या एका तरुणीचे रोलेक्स कंपनीचे मनगटी घड्याळ चोरट्यांनी कारमधून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणी मित्रासोबत ठाण्यात फेरफटका मारण्यासाठी गेली असताना हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ लाख रुपये किमतीचे हे घड्याळ होते.

‘यु.के.’ य देशात २५ वर्षीय मुलगी राहत असून ती कलाकार आहे. ती जन्मापासूनच तेथे कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. तसेच तिला महागड्या वस्तू खरेदीची सवय आहे. तिच्याकडे आठ लाख ४० हजार रुपये किमतीचे रोलेक्स कंपनीचे मनगटी घड्याळ होते. होळी सणानिमित्ताने ती १४ मार्चला तिच्या ठाण्यातील एका मित्राकडे आली होती. २० मार्चला ती मित्रासोबत कारने ठाणे शहरात फिरण्यासाठी निघाली होती. ते नितीन कंपनी येथील सेवा रस्ता परिसरात आले. त्यांनी तेथे पायी फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तरुणीने मनगटातील आठ लाख ४० हजार रुपये किमतीचे घड्याळ तिच्या पर्समध्ये काढून ठेवले. त्यानंतर ती पर्स कारमध्येच ठेवली. दोघेही कारमधून उतरुन पायी जात होते. १५ मिनीटे फेरफटका मारून आल्यानंतर ते कारजवळ परतले. त्यावेळी त्यांच्या कारच्या खिडकीची काच फुटलेली दिसली. तसेच कारच्या मागच्या आसनावर ठेवलेली पर्स देखील गायब होती. त्यांनी परिसरात चोरट्याचा शोध घेतला. परंतु कोणीही चोरटा आढळला नाही. २२ मार्चला त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.