नदी संवर्धन प्रकल्प कागदावरच; हरित लवादाची प्रदूषण रोखण्याची सूचना; सांडपाण्यामुळे पाण्याची शुद्धता धोक्यात
ठाणे जिल्ह्य़ातील शहरी विभागांचा मुख्य जलस्रोत असलेली उल्हास नदी सध्या काठावरील वाढत्या शहरीकरणांमुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कर्जत ते बदलापूर परिसरातील वाढते नागरीकरण आता थेट नदीच्या मुळावर आले असून ते वेळीच रोखले नाही, तर तिचीही वालधुनी होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. केंद्रीय पर्यावरण विभाग तसेच हरित लवादानेही या वस्तुस्थितीला दुजोरा देत तातडीने प्रदूषण रोखण्याची सूचना केली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वेगाने विस्तारणाऱ्या ठाण्यातील महानगरांची भविष्यकालीन पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले पोशिर, काळू आणि शाई हे तिन्ही प्रकल्प मार्गी लागू न शकल्याने सध्या उल्हास नदी आणि बारवी या तिच्या उपनदीवरील एमआयडीसीचे धरण हे दोनच पर्याय उरले आहेत. मात्र शहरातील औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीत सोडले जात असल्याने उल्हास नदीच्या पाण्याची शुद्धता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांनी नदीची पूररेषा ओलांडली आहे. नदी पात्राच्या दोन्ही दिशेला ३० मीटपर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. मात्र उल्हास नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन झालेले दिसून येते. उल्हास नदीतील हे प्रदूषण रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य नदी संवर्धन योजनेत तिचा समावेश करण्यात आला. बदलापूर हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या प्रवाहाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासाठी विकास आराखडाही तयार करण्यात आला. मात्र प्रारंभीच्या बैठकांनंतर हा प्रकल्प लालफीतशाहीत अडकला. सध्या बदलापूर शहरात खरवई, वडवली आणि बॅरेज रोड अशा तीन ठिकाणी शहरातील औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी फारशी प्रक्रिया न होता थेट नदीत सोडले जात असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. बदलापूरप्रमाणेच त्यापुढील वांगणी, नेरळ, भिवपुरी, कर्जत या परिसरातही मोठय़ा प्रमाणात नागरीकरण सुरू असून त्याचाही ताण उल्हास नदीच्या प्रवाहावर येत आहे.

शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. सांडपाण्याच्या वाहिन्यांची जोडणी सुरू असल्याने सध्या फक्त एक ते दोन दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र शहरातील घरगुती सांडपाणी पूर्णत: जशेच्या तसे उल्हास नदीत मिसळत नाही. काही अंशी त्यावर प्रक्रिया होते. मात्र जोडणी पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल. त्यानंतर पाण्याचा पुनर्वापर करण्याचाही आमचा विचार आहे.
– देवीदास पवार, मुख्याधिकारी, कुळगाव-बदलापूर पालिका

बदलापूर औद्योगिक विभागातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र व्यवस्थित सुरू आहे. एमआयडीसीच्या वाहिन्यांमधून या केंद्रात सांडपाणी येते. त्यावर प्रक्रिया करून त्यानंतरच ते सोडले जाते. मात्र प्रक्रिया केंद्रात येण्याआधीच गळतीमुळे सांडपाणी थेट नदीत जात असण्याची शक्यता आहे.
– कुशल जैन, सांडपाणी प्रक्रिया केंद्रप्रमुख, कुळगांव-बदलापूर

बारवी धरण आणि उल्हास नदी या व्यतिरिक्त ठाणे जिल्हय़ातील शहरांपुढे पाणीपुरवठय़ासाठी सध्या तरी कोणताही पर्यायी जलस्रोत नाही. या दोन्ही ठिकाणांहून उपलब्ध होणारे अपुरे पाणी शहरांमधील वाढत्या लोकसंख्येला पुरवायचे कसे, हा यक्षप्रश्न संबंधित प्राधिकरणांपुढे आहे. त्यामुळे हा केवळ बदलापूर शहरापुरता मर्यादित प्रश्न नाही. कर्जतपासून ठाण्यापर्यंत विविध शहरे या नदीतील पाण्याचा लाभ घेतात. त्यामुळे या सर्व प्राधिकरणांनी नदी संवर्धन योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे.
– गोविंद जोशी, निवृत्त अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, डोंबिवली

 

Story img Loader