कल्याण : उल्हास नदी काठच्या मोहिली येथील पाणी पुरवठा केंद्रात (उचंदन) पुराचे पाणी शिरले आहे. या केंद्रातील पाणी पुरवठा पंप कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दुपारी १२ वाजल्यापासून बंद केले आहेत. पूर ओसरल्यानंतर हे पंप पुन्हा सुरू केले जाणार आहेत. या बंदचा कल्याण, टिटवाळा परिसरातील पाणी पुरवठ्यावर थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.
पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. तरीही मुसळधार पाऊस सुरूच राहिला तर पाणी पुरवठा पंप चालू करणे अवघड होणार आहे. त्यामुळे मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर ापाणी पुरवठा योजनेतून ज्या कल्याण पश्चिमेतील शहाड, वडवली, वालुधुनी, टिटवाळा भागाला पाणी पुरवठा केला जातो. त्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता मोरे यांनी केले आहे.
हेही वाचा… VIDEO: ठाणे महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटना टळली; विद्युत मीटर खोलीला लागलेली आग तात्काळ विझवली
पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. नदीत डोंगर दऱ्यातून पालापाचोळ्यांसह आलेले पाणी दूषित असते. या पाण्यावर प्रक्रिया करुन मगच ते पाणी पुरवठ्यासाठी पाठविले जाते. तरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने उकळून पाणी प्यावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.
हेही वाचा… कल्याण ग्रामीण भागाला पुराचा फटका, रायते पुलावर पाणी आल्याने कल्याण-नगर रस्ता बंद
मोहिली उदंचन केंद्रातून कल्याण परिसरातील काही भागांना पाणी पुरवठा केला जातो. या केंद्रात सात ते आठ पंप आहे. हे पंप २४ तास सुरू असतात. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली की हे पंप सुट्टे करुन त्यात बिघाड होऊ नये म्हणून पंपांना पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवले जातात. यापूर्वी अशी व्यवस्था नव्हती. परंतु, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, या पाणी योजनेचे देखभाल करणारे ठेकेदार संजय शहा यांनी पूर परिस्थिती पावसाळ्यात निर्माण होणार असल्याने पंपांची स्थलांतराची व्यवस्था करून घेतली आहे. पूर ओसरला की पंप पुन्हा जु्न्या जागी बसवून ते तात्काळ पाणी पुरवठ्यासाठी सज्ज केले जातात.
हेही वाचा… डोंबिवली-कल्याण जलमय
एनडीआरएफ दाखल
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कल्याण परिसरातील खाडी किनारच्या भागात पाणी शिरले आहे. काही भागातून नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे. पाणी शिरलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी महसूल विभागाच्या आदेशावरुन राष्ट्रीय आपत्ती दल बचाव पथकाचे जवान कल्याणमध्ये दाखल झाले आहेत.
वीज पुरवठा बंद
डोंबिवलीतील आयरे गाव हद्दीतील सखल भागात पाणी घुसले आहे. आयरेगाव, गणेशकृपा, विंडसर प्लाझा, विजयनगर, केळकर रस्ता, कोपर रस्ता, कल्याण पूर्व भागात राजाराम पाटील नगर, अशोक नगर, लोकधारा, मलंगगड रस्ता या भागातील वीज पुरवठा महावितरणने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला आहे.