कल्याण : मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नदी काठच्या अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्यातील २२ गावांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उल्हास खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हे पाणी उल्हास, काळू नद्यांमधून कल्याण, अंबरनाथ परिसरातून नद्यांमधून वाहत आहे. बुधवारी रात्रीपासून उल्हास, काळू नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीवरून वाहण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने या नदी काठी असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा…कल्याण-शिळफाटा, मलंगरोड जलमय
पुराचे पाणी गावात घुसण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी पुरेशी काळजी घेऊन राहण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. सतर्कतेचा इशारा दिलेल्या गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. कल्याण तालुक्यातील वरप, मोहने, वालधुनी, कल्याण, आणे, भिसोळ, रायते, आपटी, दहागाव, मांजर्ली, अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर, अंबरनाथ, एरंजाड, कुडसावरे, कान्होर, कासगाव, उल्हासनगर तालुक्यातील शहाड, म्हारळ, उल्हासनगर, भिवंडी तालुक्यातील दिवे, आगार, अंजूर, रांजनोली. या गावांच्या हद्दीत महसूल विभाग, पोलीस, आपत्कालीन पथकाने सज्ज राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.