ठाणे : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीतील जलपर्णी वाहून ठाणे शहरातील खाडीपात्रात आली आहे. या जलपर्णीने संपुर्ण खाडीपात्र व्यापले असून यामुळे खाडीवर जलपर्णीचा गालीचा दिसून येत आहे. जलपर्णी खाऱ्या पाण्यात जगू शकत नसल्याने खाडीत तिची वाढ होणे शक्य नसून यामुळे त्याचा खाडीपात्रातील जलचराला फारसा धोका नसल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमींनी वर्तविला आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला. बुधवारी पावसाचा जोर वाढला. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबण्याचे प्रकार समोर आले असून त्यापाठोपाठ आता खाडी पात्र जलपर्णी या वनस्पतीने व्यापल्याचे दिसून येत आहे. मुंब्रा रेतीबंदर पासून ते घोडबंदरपर्यंतच्या खाडी पात्रात हे चित्र दिसून येते. गालीचा प्रमाणे पसरणारी ही वनस्पती प्रकाश किरणांचा वाट अडविते आणि त्याचबरोबर पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण घटते. यामुळे जलजंतू, इतर जीव, जलवनस्पतीवर विपरित परिणाम होतो. यामुळे ठाणे खाडी पात्र व्यापणाऱ्या जलपर्णीमुळे तेथील जलचरावरवर परिणाम होण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त होत होती. परंतु जलपर्णी खाऱ्या पाण्यात जगू शकत नसल्याने खाडीत तिची वाढ होणे शक्य नाही. यामुळे त्याचा खाडीपात्रातील जलचराला फारसा धोका नसल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमींनी वर्तविला आहे.
हेही वाचा >>> बेकायदा इमारती, चाळींमुळे कल्याण-डोंबिवली तुंबली
ठाणे जिल्ह्यातील सुमारे एक कोटी नागरिकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदुषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. यातूनच उल्हास नदीचे पात्र जलपर्णीने व्यापले आहे. दोन वर्षांपूर्वीची जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेली जलपर्णी मोहिम थंडावली असून यामुळेच नदीपात्रात पुन्हा जलपर्णी वाढली आहे. हि नदी खाडी पात्राला येऊन मिळते. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार सुरू असलेल्या पाऊस सुरू असून या पावसाच्या पाण्याबरोबर नदी पात्रातील जलपर्णी वाहून खाडी पात्रात आली आहे, असा अंदाज पर्यावरणप्रेमींनी वर्तविला आहे. जलपर्णी खाऱ्या पाण्यात जगू शकत नसल्याने ती नष्ट होईल किंवा पुढे समुद्रात वाहून जाईल, असेही पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयातर्फे आषाढीनिमित्त स्वच्छता, पर्यावरण दिंडी
उल्हास नदी ही ठाणे खाडीला येऊन मिळते. या नदीपात्रात मोठ्याप्रमाणात जलपर्णी आहे. पावसाच्या पाण्याबरोबर ही जलपर्णी वाहून ठाणे खाडी पात्रात आली आहे. दरवर्षी पाऊस पडल्यावर हे चित्र दिसून येते. जलपर्णी खाऱ्या पाण्यात जगू शकत नसल्याने खाडीत तिची वाढ होणे शक्य नाही. यामुळे त्याचा खाडीपात्रातील जलचराला फारसा धोका नाही. तसेच उल्हासनदीतील जलपर्णी नष्ट करण्यासाठी ग्लायफोसेटचा वापर करण्यात येतो. परंतु ते रसायन असल्यामुळे त्याचा नदीतील जलचरांवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे या पद्धतीऐवजी इतर पर्यायांचा वापर करण्यात यावा. -रोहित जोशी पर्यावरण प्रेमी