उल्हासनगर : प्रदुषणामुळे जलपर्णीच्या विळख्यात सापडलेली उल्हास नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी राज्याचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत २८ मार्च रोजी बैठक झाली. या बैठकीत १५ दिवसात यंत्रे पुरवून जलपर्णी हटवली जातील असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या बैठकीला २० दिवस झाल्यानंतरही या यंत्रांची प्रतिक्षाच आहे. त्यामुळे यंत्रे मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

नागरी सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटक थेट नदीत मिसळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून उल्हास नदीचे प्रदुषण वाढले आहे. उल्हास नदीत बारवी धरणातून पाणी सोडले जाते. त्या पाण्यावर सुमारे ५० लाख नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहाण भागवली जाते. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर अशा विविध ठिकाणी या नदीतून पाणी उपसा केला जातो. मात्र तरीही या नदीतील प्रदुषण रोखण्यात यंत्रणांना यश आलेले नाही. त्यामुळे सध्या उल्हास नदीवर जलपर्णीची चादर पसरली आहे. नदीवर आलेल्या या जलपर्णीमुळे पाणी पातळी खालावते आहे. सोबतच पाणी प्रक्रिया केंद्रातही त्याचा अडसर येतो आहे.

सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी यांच्या आंदोलनानंतर २८ मार्च रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात राज्याचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या प्रमुख नेतृत्वात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पालिकांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. यावेळी नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे ठरले. यावेळी कृती आराखड्यासह जलपर्णी हटवण्यासाठी आणि ती होण्यापासून रोखण्यासाठीही आराखडा तयार करण्याचे ठरले होते. तसेच जलपर्णी काढण्यासाठी यंत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ठरले. येत्या १५ दिवसात एक यंत्र उपलब्ध करून दिले जाईल. तर उर्वरीत यंत्रे कमी कालावधीत उपलब्ध करून दिले जातील, असेही यावेळी ठरले.

मात्र २० दिवस उलटूनही ही यंत्रे उपलब्ध झाली नसल्याने जलपर्णी जैसे थे आहे. २० दिवसात यंत्रे येऊन जलपर्णी काढली जाईल अशी आशा होती. मात्र अजूनही अशी काही यंत्रे नदीत पात्रात जलपर्णी काढण्यासाठी आलेली दिसलेली नाहीत, अशी माहिती पर्यावरणप्रेमी शशीकांत दायमा यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीनंतर १० दिवसांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला हाताच्या साहाय्याने पाणी उचल केंद्राजवळची जलपर्णी हटवण्याची वेळ आली होती. ही यंत्रे कधी येतील याबाबत अजूनही स्पष्टता येऊ शकलेली नाही. प्रतिक्रिया: यंत्रे गुरूवारी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती आम्हाला आजच मिळाली आहे. लवकरच आम्ही नियोजन करून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करू. – राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ.