उल्हास नदीचा पर्याय अव्यवहार्य असल्याचे केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाचे मत
रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण हलका करण्यासाठी देशातील प्रमुख बंदरांमध्ये जलवाहतूक सुरू करण्याचे धोरण केंद्र शासनाच्या वतीने राबविले जात आहे. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये उगम पावून कल्याण खाडीला मिळणाऱ्या उल्हास नदीतून जलवाहतूक सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र उल्हास नदीतून जलवाहतूक अव्यवहार्य असल्याचा निर्वाळा केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाच्या जलवाहतूक विभागाने दिला आहे. त्यामुळे उल्हास नदीचा वापर जलवाहतुकीसाठी होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
देशातील विविध बंदरांचा विकास करत असताना वाहतूक समस्या सोडवण्यासाठी देशातील उपलब्ध जलसाठय़ांतून जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय केंद्रासह राज्यानेही घेतला आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या विनंतीनुसार राज्य जलवाहतूक महामंडळ स्थापनेचा मार्गही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मोकळा केला आहे. त्यामुळे राज्यातील समुद्रकिनारा आणि खाडीतून जलवाहतूक शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध महापालिकांनी चाचपणी सुरू केली आहे. त्याचधर्तीवर उल्हास नदीतूनही अशा प्रकारे जलवाहतूक सुरू करावी अशी मागणी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केंद्र सरकारच्या जलवाहतूक विभागाकडे केली होती. त्यावर उत्तर देताना केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाच्या जलवाहतूक विभागाने उल्हास नदीत जलवाहतुकीसाठी योग्य परिस्थिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यावर पुढच्या टप्प्यात कोणतेही काम केले जाणार नसल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उल्हास नदीतील जलवाहतूक व्यवहार्य नसल्याचे पूर्वीपासून बोलले जाते. उल्हास नदीतील पाण्याचा प्रवाह हा टाटा प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर अवलंबून असतो. तसेच उल्हास नदी वेगवेगळ्या वळणावर खोल उथळ पात्रातून वाहते. अनेक ठिकाणी छोटे अरुंद पूल आणि विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे सलगताही नाही. त्यामुळे उल्हास नदीत जलवाहतूक अशक्य आणि व्यवहार्य नसल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. मात्र त्यानंतरही मागणी आल्याने केंद्राने याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात उल्हास नदीचा जलवाहतुकीसाठी उपयोग होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारचा अभ्यास ठाणे खाडीबाबतही सुरू असून त्याकडे केंद्र सरकार सकारात्मकदृष्टय़ा पाहत असल्याचेही कळते आहे.
समितीचा निष्कर्ष
कल्याण ते ठाणे – मुंबई या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक ५३ च्या अभ्यासासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात वसईची खाडी आणि उल्हास नदीचा विचार करण्यात आला होता. मात्र वाहतुकीची क्षमता या मार्गात नाही असे या अभ्यासातून स्पष्ट झाले होते. जलवाहतुकीसाठी आवश्यक परिस्थिती उल्हास नदीच्या बाबतीत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.