उल्हासनगरचे कुमार आयलानी वेटिंगवर, पहिल्या यादीत आयलानी यांना उमेदवारी नाहीच

भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असली तरी उल्हासनगरचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना मात्र प्रतीक्षा यादीतच ठेवले आहे.

Ulhasnagar BJPs Kumar Ailani on waiting list Ailani is not a candidate in the first list
उल्हासनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी न दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.(कुमार आयलानी फेसबुक)

उल्हासनगर: भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असली तरी उल्हासनगरचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना मात्र प्रतीक्षा यादीतच ठेवले आहे. राज्यातील जवळपास विद्यमान आमदारांचा पहिला यादीत समावेश आहे. उल्हासनगर मतदारसंघाच्या शेजारी कल्याण पूर्व आणि मुरबाड या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारही जाहीर झाले. मात्र उल्हासनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी न दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

भाजपने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम, मुरबाड, कल्याण पूर्व, डोंबिवली, ठाणे, ऐरोली, बेलापूर अशा विविध मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यातील उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कुमार आयलानी यांचे नाव पहिल्या यादीत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सर्वात लहान मतदार संघ म्हणून उल्हासनगर ओळखला जातो. येथून कुमार आयलानी आमदार आहेत. मात्र ही जागा धोक्यात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसात रंगली आहे. येथील कुमार आयलानी यांना कलानी यांचे आव्हान आहे.

आणखी वाचा-ठाणे मतदारसंघ भाजपकडेच, आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी

आयलानी यांना गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत विरोध होतो आहे. तसेच या पाच वर्षांच्या कार्यकाळात आयलानी आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यात माजी आमदार आणि आयलानी यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले सुरेश उर्फ पप्पू कलानी गेल्या काही महिन्यांपासून शहरात सक्रिय आहेत. त्यांचे पुत्र ओमी कलानी उल्हासनगर शहरातून आयलानी यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या वतीने ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. कधी नव्हे ते कलानी उल्हासनगरची जागा पुन्हा जिंकण्यासाठी जोर लावत आहेत. त्यामुळे ही जागा भाजपसाठी धोक्यात असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच की काय कुमार आयलानी यांना पहिल्या यादीत स्थान दिले गेले नाही. त्यामुळे येथे उमेदवार बदलाचा विचार तर नाही ना अशा चर्चा रंगल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ulhasnagar bjps kumar ailani on waiting list ailani is not a candidate in the first list mrj

First published on: 20-10-2024 at 19:00 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
Show comments