उल्हासनगरच्या शहाड परिसरात असलेल्या बिर्ला उद्योग समुहाच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या अग्नीशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली आहे. कंपनीच्या समोरील बाजूस असलेल्या एका दुकानात शॉंक सर्किटमुळे आग लागली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या जवानांनी धाव घेत येथे अडकलेल्या महिला कर्मचाऱ्यांची सुटका केली. त्यांच्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. कंपनीचा सुरक्षा विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांच्या या धाडसाचे आता शहरातून कौतूक होते आहे.

कर्मचाऱ्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता –

शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या कामगार प्रवेशद्वारा समोर रवि तलरेजा यांचे रँम्बो पार्टी हे दुकान आहे. त्या दुकानात गुरूवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शॉक सर्किटमुळे अचानक आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे दुकानात काम करण्याऱ्या महिला कर्मचारी घाबरल्या. त्यांनी दुकानाच्याच वरच्या मजल्यावर धाव घेतली. मात्र दुकानात लागलेली आग वेगाने पसरली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. दुकानातील आग आणि महिलांची ओरड ऐकून सेंच्युरी रेयॉन कंपनीचे(निवृत्त कर्नल) सुरेश शिंदे यांनी आपल्या अग्निशमन दल व सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

सागर बेडेकर,अमीत रासकर,कमलेस सिंग, बी.डी.घाडगे,दिपक पाटील,विजय चौगुले,राहुल सोनवणे,संतोष भोसले,कैलास चव्हाण, आर.एन.पाटील, एस.पनाडकर या जावानांनी जिवाची पर्वा न करता दुकानात वरच्या मजल्यावर अडकलेल्या तब्बल २० महिला कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. तर दुकानात लागलेली आगही विझवली.

जवान वेळेवर पोहचले नसते तर…

अग्निशमन दलाच्या जवानांनी व सुरक्षा विभागाच्या जवांनानी दाखवलेल्या धाडसाबद्दल कंपनीच्या व्यवस्थापनाने त्या सर्वाचे कौतुक केले. या ठिकाणी सेंच्युरी रेयॉन कंपनीचे जवान वेळेवर पोहचले नसते तर मोठी जिवीतहानी झाली असती असे सांगत महिला कर्मचाऱ्यांनी या जवानांचे आभार मानले आहेत.

Story img Loader