ठाणे / उल्हासनगर : विविध गैरप्रकरणातून सुटका करून आणलेल्या मुलांना उल्हासनगर येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात येते. मात्र या बाल निरीक्षण गृहाचा कारभार वादात सापडला आहे. बालविवाहातून सुटका करून निरीक्षण गृहात ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलीने इतर अल्पवयीन मुलींकडून आपला छळ झाल्याचा आरोप केला आहे. तर तिची सुटका करण्यासाठी निरीक्षण गृहाच्या व्यवस्थापनाने पैशांची मागणी केल्याचा तिच्या पालकांनी आरोप केला आहे. याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तर याच बाल निरीक्षण गृहातून मागील महिन्यात सात मुलींनी पळ काढल्याची घटना समोर आली होती. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत या घटनांमुळे या निरीक्षण गृहाचा कारभार वादात सापडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालविवाह, अवैध दत्तक प्रक्रिया, लैंगिक शोषण मारहाण यासारख्या विविध प्रकरणातून सुटका करून आणलेल्या बालकांची जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या उल्हासनगर येथील बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात येते. याच पद्धतीने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उल्हासनगर येथील भाटिया हॉल येथे एका सोळा वर्षीय मुलीचा तिच्या पालकांनी बालविवाह लावून देण्याचा घाट घातला होता. जिल्हा बाल संरक्षण विभागाला याची माहिती प्राप्त होताच त्यांनी धडक कारवाई करून हा बालविवाह रोखला. नंतर मुलीला उल्हासनगर येथील बाल निरीक्षणगृहात ठेवले. मात्र या मुलीकडून आता आपला निरीक्षणगृहात इतर मुलींनी छळ केल्याचा आरोप केला जात असल्याची माहिती दिली आहे. तर याबत पालकांना विचारणा केली असता मुलीला सोडण्यासाठी निरीक्षण गृहाच्या व्यवस्थापनाने पैशांची मागणी केली असल्याची माहिती दिली.

२४ फेब्रुवारी रोजी विवाह रोखून संबंधित मुलीला उल्हासनगर येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले होते. यावेळी निरीक्षण गृह व्यवस्थापनाने आपल्याला लादी पुसणे, भांडी घासणे, झाडू मारणे यांसारखी कामे दिल्याचा आरोप मुलीने केला आहे. तसेच ही कामे न केल्यास निरीक्षणगृहातील इतर मुलींकडून आपल्याला धमकवल्याचा आरोपही मुलीने केला आहे. त्यामुळे मुलीला मानसिकरित्या धक्का पोहोचला असून तिच्यावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारभारावर प्रश्नचिन्ह

याच निरीक्षण करतात सुमारे एक महिन्यापूर्वी निरीक्षणगृहाच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून सात मुलींनी पलायन केल्याची घटना समोर आली होती. यातील सहा मुलींचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला यश आले असून त्यांची पुन्हा निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. एक मुलगी अद्याप बेपत्ता असून तिचा पोलिसांमार्फत शोध सुरू आहे. तर पुन्हा निरीक्षण गृहात आलेल्या मुलींची चौकशी केली असता गृहातील व्यवस्थापनावर त्यांनी बोट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित मुलीचा बालविवाह थांबवून तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिला उल्हासनगर येथील बालनिरीक्षण गृहात ठेवले होते. मुलीने आणि तिच्या पालकांनी केलेल्या आरोपातील सतत्या तपासण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.याचा अहवाल लवकरच येणार आहे. संतोष भोसले, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ठाणे</p>