उल्हासनगर : विविध १८० गुन्ह्यांची उकल करत तब्बल ६५ लाखांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदार आणि फिर्यादींना देण्यात उल्हासनगरच्या परिमंडळ चारच्या पोलिसांना यश आले आहे. नुकताच परिमंडळ चारच्या वतीने रेझींग डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चोरट्यांनी लांबवलेले महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने, वाहने संबंधितांना परत देण्यात आला. त्यामुळे तक्रारदारांमध्येही समाधानाचे वातावरण होते.

गेल्या काही वर्षात महागड्या मोबाईल चोरी, सोन्याच्या दागिन्यांची आणि वाहनांची चोरीचे अनेक प्रकरणे समोर आले होते. या सर्व गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जसाश तसा मिळणे गेल्या काही काळात दुरापास्त झाले होते. मात्र ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ चारच्या पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १८० गुन्ह्यांची यशस्वी उकल केली. या गुन्ह्यात तक्रारदारांचा मुद्देमालही मिळवण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे हा मुद्देमाल तक्रारदारांना पुन्हा देण्यासाठी उल्हासनगर कॅम्प तीन येथील सिंधू भवन येथे विशेष सोहळा आयोजीत करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते मुद्देमालाचा परतावा करण्यात आला. या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी, शैलेश काळे यांसह परिमंडळ चारमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे , विष्णू ताम्हणे, अनिल पडवळ, अनिल जगताप, रमेश पाटील, अनिल थोरवे, किरण बालवडकर आणि कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा…कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळीचा, मोबाईल तपासणीसाठी फाॅरेन्सिक प्रयोगशाळेकडे

या कार्यक्रमात जप्त केलेला ६५ लाख ७० हजार १५६ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. यामध्ये सोन्याचे १३ दागिने, २७ मोटारसायकली, २०० मोबाईल फोन अशा वस्तूंचा समावेश आहे. या मुद्देमालाच्या हस्तांतरणामुळे अनेक कुटुंबांचे झालेले नुकसान भरून निघाले. चोरी झालेला मुद्देमाल परत मिळू शकतो याची शक्यता नसल्याने वस्तू परत मिळाल्याने आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिल्या.

Story img Loader